चंद्रपूर : भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याच्या वृत्ताने चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे भरते आले आहे. अपेक्षेनुरूप सायंकाळी शपथविधीदरम्यान त्यांचे नाव येताच दूरचित्रवाहिनीसमोर बसलेल्या जिल्ह्यातील जनेतेने फटाके फोडून आणि गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला.चंद्रपुरातील गिरनार चौकात लावलेल्या फटाक्याच्या लडीमुळे परिसर निनादून गेला. असाच अनुभव मूल, बल्लारपूर, पोंभूर्णा यासह गावखेड्यावरही अनुभवास मिळाला. चंद्रपुरात आणि मूल व बल्लारपुारत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि पेढे वाटून त्यांच्या मंत्रिपदाच्या घोषणेचा आनंद व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतेक भाजपा नेते शपथविधीचा सोहळा पाहण्यासाठी मुंबईला गेले असले तरी, स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र आनंद व्यक्त करण्यात कसलीही कसर सोडली नाही. काही ठिकाणी संदल वाजवून त्यांच्या मंत्रीपदाचे स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी फटाके फोडून आणि घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.चंद्रपुरात सायंकाळ काही कार्यकर्त्यांनी वाहनावर झेंडे लावून त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. आज दिवसभर चंद्रपुरातील वातावरण उत्साही होते. मंत्रीमंडळात समावेश झाल्यावर आता सुधीर मुनगंटीवारांना कोणते खाते मिळेल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तशी विचारणा करणारे फोन भाजपाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांकडून धडकत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मुनगंटीवारांना कॅबिनेट; सर्वत्र जल्लोष
By admin | Updated: November 1, 2014 01:37 IST