वरोरा : मागील दोन महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदीला सुरूवात झाली. त्यामुळे वैधरित्या दारू विक्री करणारे व्यवसायिक व त्यावर विसंबुन असणाऱ्यांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच वरोरा येथील एका बंद असलेल्या बियरबारमधून आता दर्जेदार दूध विक्रीचा व्यवसाय एका व्यवसायिकाने नुकताच सुरू करून आपल्या उपजिविकेचा मार्ग शोधून काढला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर अनेक व्यवसायिकांनी बियरबार व दारूची दुकाने बंद केली, तर काही व्यवसायिकांनी रेस्टॉरंट सुरू केले. यातील अनेक प्रतिष्ठाने मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्या विक्रीसाठीही काढल्या. परंतु सध्या इमारत व जमिनीच्या व्यवसायात मंदी असल्याने घेण्यास कुणीही तयार नाही. मद्यविक्रीचे परवानेही विक्रीसाठी काढले. परंतु दर अधिक असल्याने त्यालाही अनुकूल प्रतिसाद मिळत नसल्याने परवानाधारक त्रस्त झाले आहेत. वरोरा शहरात स्थायी झाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात परवाना सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने व्यवसायिकांनी तोही विचार सोडून दिला आहे. दोन महिन्यांपासून व्यवसाय बंद आहे. काय करायचे, असा प्रश्न उभा असताना वरोरा शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील बंद असलेल्या बियरबार इमारतीमध्ये एका व्यावसायिकाने नुकताच दूध व दूध उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला आहे. दुधाचा व्यवसाय सुरू करताना या व्यवसायिकाला इमारत, काऊन्टर, फ्रिज आदी साहित्य नव्याने घ्यावे लागले नाही. सदर दूध एका नामांकीत संस्थेतील असून ते वरोरा शहरात मिळत आहे. त्यामुळे ग्राहकही याला पसंती देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
बारमधून दूध विक्रीचा व्यवसाय
By admin | Updated: June 7, 2015 01:05 IST