नागभीड : दुपारचे १२ वाजले असतील... अचानक बंदुकीतून गोळी सुटल्याचा आवाज येतो... आणि सर्वांचीच पाचावर धारण बसते. आजूबाजूचे व्यावसायिक आवाजाच्या दिशेने धावतात. पण नशीब एवढे बलवत्तर की बंदुकीतून सुटलेली गोळी एका खिडकीला छेदलेली असते. आणि मोठा अनर्थ टळलेला असतो.
येथील बँक ऑफ इंडियाच्या नागभीड शाखेत घडलेल्या या थराराची बुधवारी चांगलीच चर्चा रंगली होती. त्याचे झाले असे की सुरक्षा रक्षकाने त्याची बंदूक प्रवेशद्वाराजवळील खिळ्याला अटकवून ठेवली. पण तो खिळा तुटला की काय बंदूक खाली पडली आणि काही कळायच्या आत त्या बंदूकीतून गोळी बाहेर पडली व बाजूलाच असलेल्या खिडकीला छेदून गेली. अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या व्यावसायिकानी चांगलीच गर्दी केली. जो तो काय झाले म्हणून एकमेकांकडे विचारणा करू लागला. पण कोणीच काही बोलत नव्हते. काही वेळानंतर सुरक्षा रक्षकाची बंदूक खाली पडली व बंदुकीतून सुटलेली गोळी खिडकी छेदून गेली, हे समजले. सुदैवाने कोणाला कसलीही इजा झाली नाही. हे समजल्यावर सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर तक्रार केली असल्याची माहिती बँक व्यवस्थापकांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.