ग्रामस्थांचा आरोप : पाणी सोडणे बंद करण्याची मागणी वरोरा : सनफ्लॅग भूमिगत कोळसा खाणीतील पाणी नाल्यामध्ये सोडले जाते, हे पाणी दूषित आहे. दूषित पाणी पिल्यामुळे कोंठाळा गावातील बकऱ्या मरण पावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कंपनीने दूषित पाणी सोडने बंद करावे अन्यथा मोठी प्राणहानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.येन्सा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोंढाळा पारधी टोल्यानजीक सनफ्लॅग भूमिगत कोळसा खाणीचे पाणी एका नाल्यामध्ये सोडले जाते. सदर पाणी बेलगाव, पिंपळगाव आदी गावानजीकच्या नाल्यामधून वाहत असते. सध्या सर्वत्र नदी नाल्यातील पाणी आटल्यामुळे कंपनीतून निघून जाणाऱ्या नाल्यातील वाहते पाणी जनावरे पित असता तर कोंढाळा पारधी टोल्यानजीक नाल्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी येत आहे, त्या ठिकाणी मोठी दलदल निर्माण झाली आहे. यामध्ये जीवित हानी होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे. ५ फेब्रुवारी रोजी कोंढाळा पारधी टोला येथील दिंगाबर पवार यांच्या दोन बकऱ्यांनी या नाल्यातील पाणी पिल्याने त्या अस्वस्थ झाल्या व ६ फेब्रुवारी रोजी मरण पावल्या. त्यामध्ये भूमिगत खदानीतील दूषित पाणी पिल्याने बकऱ्या मरण पावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
दूषित पाणी पिल्याने बकऱ्यांचा मृत्यू
By admin | Updated: February 9, 2016 00:46 IST