चंद्रपूर : दारू पिवून वाहन चालविणाऱ्यांना आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण चंद्रपुरातील पोलिसांच्या हातात आता ब्रिथ्स अॅनालायझर आले असून गेल्या तीन दिवसांपासून तपासाचा आणि कारवायांचा धडाका पोलिसांनी लावला आहे.जिल्ह्यातील पोलिसांच्या सेवेत आता १२ ब्रिथ्स अॅनालायझर मशिन रूजू झाल्या आहेत. यापूर्वी वाहतूक शाखेकडे दोन मशिन होत्या. एक मशिन चंद्रपुरातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे होती. मात्र जिल्ह्यभरातील तपासाच्या दृष्टीने ही उपकरणे अपुरी पडत असल्याने त्यात नव्यांची भर पडली आहे. आता चंद्रपूर शहर, रामनगर, वरोरा, राजुरा, बल्लारपूर, मूल आणि ब्रह्मपुरी पोलिसांकडेही दोन महिन्यांपूर्वीच या मशिन पोहोचल्या आहेत.चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलिसांनी गणेशोत्सवाच्या काळातील सुरक्षिततेचा उपाय म्हणून वाहनचालकांची तपासणी सुरू केली आहे. शहरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर यांनी गेल्या तीन दिवसात राबविलेल्या कारवाईत १० मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या ब्रिथ्स अॅनालायझर उपकरणात व्यक्तीने किती प्रमाणात अल्कोहोल सेवन केले याचे प्रमाण तात्काळ कळते. त्याची प्रिंटसुद्धा काढता येते. वाहनचालकाची वैद्यकीय तपासणी करण्याचा आणि त्यात वेळ आणि मनुष्यबळ खर्ची होण्याचा अपव्यय यातून टळला आहे. वाहनचालकांच्या तोंडात या मशिनचा पाईप देऊन त्याला जोरात श्वासोच्छवास करायला सांगितले जाते. श्वासावाटे त्याच्या शरिरातील अल्कोहोलचे प्रमाण या मशिनच्या स्क्रिनवर उमटते. जिल्हा पोलीस अधिक्षकाननी अलिकडेच ठाणेदारांची बैठक घेऊन आपआपल्या क्षेत्रातील मद्यपी वाहनधारकांवर नियंत्रण राखण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी दिसायला लागली आहे. जिल्ह्यात अलिकडच्या काळात मोठ्या प्र्रमाणावर रस्ता अपघात घडले आहे. अनेक घटनांमध्ये मद्यपी वाहनचालकांचा दोष असल्याचे प्रकाशात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
ड्रंकन ड्राईव्हवर ब्रिथ अॅनालायझरचा चाप
By admin | Updated: September 2, 2014 23:38 IST