चंद्रपूर : बीपीएलधारक ग्राहकांच्या थकीत वीज बिलाचे १८ महिन्यांचे १८ हप्ते पाडून भरणा करण्याची सवलत द्यावी, तसेच नियमित बिल भरणाऱ्यांना व्याज व दंड आकारू नये, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्र्यांकडे केली आहे.
लॉकडाऊन कालावधीतील थकित वीज बिलापोटी सामान्य ग्राहकांचा पुरवठा खंडित केल्या जात असल्याने महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्यासह विश्रामगृहात बैठक घेतल्यानंतर ही माहिती दिली.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, महापौर राखी कंचलार्वार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, रवी गुरनुले, ब्रिजभूषण पाझारे आदि उपस्थित होते.
केशरी शिधापत्रिकाधारक वीज ग्राहकांना १२ महिन्यांचे १२ हप्ते पाडून बिल भरण्याची मुभा द्यावी, वीज खंडित करण्यापूर्वी १५ दिवसात दोनदा नोटीस द्यावी, महावितरण उपविभागीय कार्यालयात माहिती कक्ष तयार करावा, १८ मार्च २०२१ पासून पूढील १० दिवस कनेक्शन कापू नये, पुढील आठ दिवस वृत्तपत्रांमध्ये योजनेची माहिती द्यावी, वसुली ८० टक्क्यांच्या असल्यास वीज पुरवठा बंद करू नये, आदी सूचना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. चालु बिलासहीत जुने बिल थकित असल्यास ग्राहकांनी एकंदर रकमेच्या ३० टक्के रक्कम भरून उरलेले बिल १२ महिन्यात समान हप्त्याने १ टक्का व्याजासह भरावे, असे स्पष्टीकरण महावितरणचे मुख्य अभियंता देशपांडे यांनी यावेळी दिले.