चंद्रपूर : चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या ३७ व्या वर्धापनदिनी प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी समितीच्या नेतृत्वात २५० प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थिंनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. वीज निर्मितीसाठी योगदान देत असताना सीएसटीपीएस अंतर्गत येणाऱ्या सर्वच घटकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी केले होते.
महारक्तदान शिबिराप्रसंगी सीएसटीपीएसचे सर्व अधिकारी, अभियंता, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. ३७ व्या वर्धापनदिनी यंदा महारक्तदान शिबिर आयोजित करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी समितीनेही या शिबिरात उत्साहाने सहभागी होऊन रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. कृती समितीचे अध्यक्ष संजय ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींची बैठक घेऊन रक्तदान करण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे २५० प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींनीही रक्तदान केले. मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्या हस्ते अध्यक्ष ठाकरे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.