चंद्रपूर : तडजोड आणि फोडाफाडीच्या राजकारणाचा आधार घेत येथील जिल्हा परिषदेत भाजपाने आपला झेंडा फडकविण्यात यश मिळविले आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन फक्त एका अध्यक्षपदावर सत्ता मिळविणाऱ्या भाजपाने यावेळी मात्र राष्ट्रवादीला बाहेर ठेवून मित्रपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही मुख्य पदेही आपल्याकडेच राखण्याची किमया साधली आहे.भाजपाच्या संध्या गुरुनुले या ३० मते मिळवून अध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसच्या ज्योती जयस्वाल यांना २६ मते मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या कल्पना बोरकर यांना ३० तर, अमर बोडलावार यांना २६ मते मिळाली. सर्व म्हणजे ५७ सदस्य सभागृहात उपस्थित होते. मात्र काँग्रेसच्या चित्रा डांगे यांनी तठस्थ भूूमिका घेतली. तर, राष्ट्रवादीचे पंकज पवार यांनी ऐन मतदानाच्या वेळी सभागृहात भाजपाला साथ दिल्याने भाजपाचा विजय झाला.अध्यक्षपदासाठी पाच जणांचे नामांकन आले होते. भाजपाकडून संध्या गुरुनुले तर, काँगे्रसकडून ज्योती जयस्वाल, चित्रा डांगे, पद्मा कामडी व संगीता घोंगडे यांनी अर्ज दाखल केले. तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून अमर बोडलावार, भाजपाकडून कल्पना बोरकर, काँग्रेसकडून दिनेश चिटणूरवार, विनोद अहिरकर, अरुण गभणे, राष्ट्रवादीकडून चंद्रकांत गुरु यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र अन्य उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याने संध्या गुरुनुले व ज्योती जयस्वाल यांच्यात अध्यक्षपदासाठी तर कल्पना बोरकर, अमर बोडलावार यांच्यात उपाध्यक्षपदासाठी लढत झाली. (जिल्हा प्रतिनिधी)
मित्रपक्षांच्या मदतीने भाजपाने मिनी मंत्रालय राखले
By admin | Updated: September 21, 2014 23:47 IST