गोंडपिंपरी येथील जि. प. कन्या शाळेतील प्रकार : पंचाच्या निर्णयावरुन पेटला वाद गोंडपिपरी : बौद्धीक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मात्र कबड्डी सामन्यादरम्यान पंचाच्या बाद देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या शिक्षकाचा राग अनावर झाल्याने मैदानात असलेल्या पंचावर धावून गेल्याचा प्रकार गुरूवारी गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जि.प. कन्या शाळेत घडला. त्यामुळे कलागुणांना वाव देणाऱ्या शिक्षकातच वादाची भावना असेल तर विद्यार्थ्यांना घडवतील का, असा प्रश्न आता पालकांकडून विचारला जात आहे. जि.प. कन्या शाळेत आयोजित बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान गुरूवारी दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास माध्यमिक गटातील मुलींचा कबड्डी सामना चेकपिपरी विरुद्ध वडकुली असा सुरू होता. सामन्याचे पंच म्हणून फुर्डी हेटी शाळेचे शिक्षक गावळे व गणेशपिपरीचे शिक्षक नरूले होते. कबड्डी सामना रंगतदार सुरू असताना पंच नरूले यांनी चेकपिपरीच्या एका स्पर्धकाला बाद दिले. तेव्हा वडकुली येथील स्पर्धकांचे सहकारी शिक्षक गुट्टे यांना नरूले यांचा निर्णय मान्य नव्हता. त्यामुळे ते मैदानात असलेल्या पंच नरूले यांच्यावर धावून गेले. नरुले यांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता गुट्टे हे आक्रमक झाल्याने दोन्ही शिक्षकात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी उपस्थित असलेले केंद्रप्रमुख प्रेमचंद चांदेकर यांनी मध्यस्ती करून समजूत काढली व सामन्याला पूर्ववत सुरुवात केली. सामन्यादरम्यान शेकडो नागरिकांसह पालकही उपस्थित होते. या दोन शिक्षकात झालेली खडाजंगी सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामुळे शैक्षणिक क्षेत्राला गालबोट लागला असून वरिष्ठ काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे. (शहर प्रतिनिधी)
बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेत शिक्षकांत जुंपली
By admin | Updated: December 23, 2016 00:46 IST