दहशतीचे वातावरण : तीन जणांना नागपूरला हलविले नागभीड/ चिखलपरसोडी : नागभीड आणि लगतच्या काही गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी व बुधवारी तब्बल १५ लोकांना या कुत्र्याने चावा घेतला आहे. यातील तीन जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. कुत्र्याचा या धुमाकुळामुळे परिसरात सध्या चांगलीच दहशत पसरली आहे. या कुत्र्याने आतापर्यंत सुलेझरी, चिखलपरसोडी, भिकेश्वर व नागभीड परिसरातील १५ जणांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भीतीमुळे आज अनेक शाळकरी मुलांना शाळेत पाठविण्यास त्यांच्या पालकांनी नकार दिला. सदर कुत्र्याचा बंदोबस्त झाल्याशिवाय पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. दोन दिवसामध्ये सुलेझरी, चिखलपरसोडी, भिकेश्वर व नागभीड परिसरातून भ्रमण करीत या कुत्र्याने १५ जणांना रस्त्यामध्ये, अंगणात बसलेल्या लोकांना तर शाळेत जात असलेल्या मुलांना चावा घेतला. किरण रवींद्र राऊत, केवळराम शामकुळे, सष्टीवन म्हशाखेत्री, हादीया खान, दिव्यांशू गायधने, कार्तिक मोहजनवार, शुभांगी बगमारे, हयांशू साहारे, किरण राऊत, मेघा मिसार, सुजल नाकतोडे, किशोर बोरकर, पंजक तांडे, सुबोध नागोशे, तुळशिराम दडमल यांना सदर कुत्र्याने चावा घेतला असून किरण राऊत, केवळराम शामकुळे, सष्टीवन म्हशाखेत्री यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.अनेक जणांना कुत्र्याने अतिशय जोराचा चावा घेतल्याने त्यांनी मोठी जखमी झाली आहे. जखमींवर नागभीड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करुन घरी पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, सदर कुत्रा अजूनही मोकाट असून लोकांना चावा घेत या गावातून त्या गावात फिरत आहे. त्यामुळे परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये दशहत पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा
By admin | Updated: January 5, 2017 00:44 IST