चंद्रपूर : जिल्ह्यात अद्याप ‘बर्ड फ्ल्यू’ चे निदान झालेले नाही. मात्र, स्थलांतरित पक्षी, पाणथळे, तलाव येथे, तसेच पोल्ट्री फार्म येथे यंत्रणांनी पाळत ठेवून सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पशुसंवर्धन, तसेच जलसंधारण विभागाला दिले आहे.
देशात आढळलेल्या बर्ड फ्ल्यू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अे.एन.सोमनाथे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात राज्यस्तर व स्थानिकस्तर असे एकूण १६२ पशुवैद्यकिय संस्था असून, त्यांचे माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू झालेले आहे. रोगाचा शिरकाव झाल्यास दक्षता म्हणून प्रत्येकी ३ अधिकारी, कर्मचारी समाविष्ट असलेले एकूण ११ शीघ्र कृती दल तयार करण्यात आले आहे.
आपल्याकडे आहाराच्या पद्धती लक्षात घेता, तसेच अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास या रोगाचा विषाणू निष्क्रिय होत असल्याने, अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर कोंबडी विक्रेत्यांनी आपल्या ग्राहकांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत होण्याकरिता कोंबड्या कापल्या जातात, तेथे मास्क व ग्लोव्हजचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
बाॅक्स
माहिती द्या
जिल्ह्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांमध्ये मर्तुक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये अचानक व जास्त मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये याची माहिती द्यावी.
बाक्स
संपर्क करा
चंद्रपूर बर्ड फ्लू कंट्रोल रूम जिल्हा समन्वयक दूरध्वनी क्र.डॉ.पी.डी. कडुकर, डॉ.विनोद रामटेके व संदीप राठोड यांच्याकडे संपर्क करून, त्याची माहिती द्यावी. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येऊ नयेत.