पालकमंत्र्यांचे आश्वासन : जलसेतूच्या कामाची पाहणी चंद्रपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या ब्रह्मपुरीजवळील जलसेतूमधून तात्पुरत्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येणार आहे. आसोलामेंढा अंतर्गत येणाऱ्या मूल, सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यामुळे निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेला, हवालदिल बळीराजा आता सुखावणार, असा विश्वास राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.जलसेतूच्या कामाचा आढावा व पाहणी करण्याकरिता राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांसमोर काम स्थळाला भेट दिली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या जलसेतूच्या अंतिम कामाची पाहणी करून येत्या १० तारखेला पाणी आसोलामेंढा तलावाच्या लाभार्थी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही वाढई व रत्नपारखी या विदर्भ सिंचन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिली. या दरम्यान ना. मुनगंटीवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सदर कामाला गती देऊन कोणत्याही परिस्थितीत येत्या १० तारखेला पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे भ्रमणध्वनीवरून आदेश दिले.शिष्टमंडळात भाजपाचे जिल्हा महामंत्री हरीश शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष चंदू मारगोनवार, मूल भाजपाचे चंद्रकांत आष्टनकर, मूल राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव शेंडे, माजी सरपंच संजय येनूरकर, शाळा समितीचे माजी सभापती प्रवीण येनूरकर, भाजपा सरचिटणीस दिवाकर फाले, युवा नेते नितीन गुरुनुले, युवा मोर्चाचे दिलीप पाल यांचा समावेश होता. पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांत आनंद पसरला असून याचा नक्कीच पिकांना फायदा होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गोसेखुर्दच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मिळणार लाभ
By admin | Updated: September 10, 2015 00:56 IST