चंद्रपूर : कोरोना संकटाच्या दिवसामध्ये सामाजिक भान ठेवून गोरगरीब रुग्णांना गृहविलगीकरणाची मोफत सेवा पुरविणारे चंद्रपुरातील डाॅ. प्रवीण येरमे यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तेलनेमध्ये शासकीय आरोग्य सेवा कमी पडत आहे. अशावेळी नागरिकांचे बेहाल होत आहे. कोरोना रुग्ण इकडून तिकडे उपचारासाठी फिरत आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत काही जण अव्वाच्या सव्वा फी आकारून गरीब रुग्णांच्या खिशातच हात घालत आहे. एकीकडे आरोग्याचा प्रश्न असताना दुसरीकडे आर्थिक अडचणीचा सामना रुग्णांना करावा लागत आहे. या बिकट परिस्थितीमध्ये येथील डाॅ. प्रवीण येरमे यांनी समोर येऊन गरजू कोरोना रुग्णांना गृहविलगीकरणामध्ये मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दररोज शेकडो रुग्णांना याचा फायदा होत आहे. या त्यांच्या कार्याची दखल घेत येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने, शाल श्रीफल तसेच स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता, जिल्हा उपाध्यक्षा माया मेश्राम व शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.