जखमी झालेल्या युवकाचे नाव गणेश उध्दव तुपटे (२७) रा. देऊळगाव असे आहे. तर आरोपींचे नाव दिनेश तुपटे (३५) व सुरेश तुपटे (३७) रा. देऊळगाव असे आहे. देऊळगाव येथील रहिवासी असलेले गणेश तुपटे हे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बचत गटाच्या बैठकीसाठी घरुन गावातील चौकाकडे जात असताना वाटेत आरोपी दिनेश तुपटे व सुरेश तुपटे या दोन्ही भावांनी त्याला अडविले. तुझ्या शेतातले पाणी माझ्या शेतात घुसल्याने आमच्या पिकांचे नुकसान झाले. असे सांगून दोघांनीही बांबूच्या काठीने गणेश तुपटे याला मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार बघितल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
आरोपीविरुद्ध ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन मध्ये भादंवि ३२३, ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे करीत आहेत.