भद्रावती : केंद्रातील व राज्यातील सरकार देशातील व राज्यातील जनतेला दिलेल्या शब्दाला अपयशी ठरले. हे आता सामान्य जनतेला कळून चुकले आहे. शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब नागरिकांना दिलेले अच्छे दिनाचे आश्वासन फोल ठरले असून देशातील नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या सुख दु:खात सहभागी होवून त्यांच्या दारापर्यंत पोहचण्याची नितांत गरज आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करूनच पक्ष बांधणीच्या कार्याला सुरुवात करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.स्थानिक विश्रामगृहात गुरुवारी कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्षाने जनतेचा विश्वासघात केला. सर्वसाधारण व गोरगरीब जनतेला केरोसीन मिळत नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खंबीर नेतृत्त्वाची देशाला गरज असल्याचेही यावेळी पटेल म्हणाले. याप्रसंगी माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा युवा नेते मुनाज शेख, वरोरा येथील नगराध्यक्ष जनाबाई पिंपळकर, अॅड. प्रदीप बुराण, बंडू भोंगगाडे, नगरसेवक लता हिवरकर, शांताराम नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष शरद जीवतोडे, वरोरा तालुका अध्यक्ष बंडू साखरकर, विलास नेरकर, शहर अध्यक्ष सुनील महाले, सुधाकर रोहणकर, नामदेव मत्ते, सुनील तेलंग, विठ्ठल हनवते, राजेश मत्ते, रोहण कुटेमाटे, आशिष कार्लेकर आदी उपस्थित होते. माजी मंत्री अनिल देशमुख बोलताना म्हणाले, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आणि मोठे करण्याची भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली आहे. संचालन प्रशांत काळे यांनी केले तर आभार सुनील महाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
जनतेच्या सुख-दु:खात समरस व्हा- पटेल
By admin | Updated: June 20, 2016 00:37 IST