मुंबईत बैठक : राज्य शासनाच्या वेजेसनुसार नोकरीची केपीसीएलकडून हमी चंद्रपूर : बरांज येथील कर्नाटक एम्टा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न अखेर मार्गी निघाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत केपीसीएल व्यवस्थापनाने नोकरी, पुनर्वसन निधी आणि वाढीव मोबदला मान्य केल्याने मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला विराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भद्रावती तालुक्यातील बरांज येथील कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लिमिटेड येथील प्रकल्पग्रस्तांचा मागील काही वर्षांपासून व्यवस्थापनासोबत संघर्ष सुरू होता. प्रकल्पग्रस्तांच्या शेतजमिनी अधिग्रहीत केल्यावरही नोकऱ्या आणि योग्य मोबदला न मिळल्याने असंतोष होता. शेतजमीनीला मिळालेला मोबदला अपुरा असल्याचीही ओरड होती. मागील अनेक दिवसांपासून या विषयावर आंदोलने सुरू होती. त्यामुळे व्यवस्थापन विरूद्ध गावकरी असे संघर्षाचे चित्र निर्माण झाले होते. दरम्यान, केंद्रीय रसायन आणि उर्वारक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील दालनात या विषयावर बैठक आयोजित करून चर्चा घडवून आणली. या बैठकीला कर्नाटकचे उर्जामंत्री शिवकुमार, केसीएलचे व्यवस्थापकीय संचालक महेशराव, राजुराचे आमदार संजय धोटे, राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव गोविंदराज, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीदरम्यान, ना. हंसराज अहीर यांनी प्रलकल्पग्रस्तांच्या मागण्या मांडून व्यवस्थापनाचे धोरण कसे चुकीचे आहे, यावर प्रकाश टाकला. मुख्यमंत्र्यांनीही या विषयावर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली. मागण्यांची दखल घेवून बैठकीतच निर्णय द्यावा, असे निर्देश दिले. उभयपक्षात झालेल्या चर्चेनंतर केपीसीएल कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या नोकरची हमी घेवून या कर्मचारी आणि कामागारांना कोल इंडिया लिमीटेडच्या वेजेसशी निगडीत व राज्य शासनाच्या वेजेसनुसार नोकरीवर घेण्याची सहमती दिली. प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसह पुन्हा एकरी चार लाख रूपयांचा मोबदला देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. नोकरीच्या बदल्यात पाच हजार रूपये आणि पुनर्वसनाचे तीन लाख रूपये देण्याचेही मान्य करण्यात आले. २००८ मध्ये झालेल्या करारनाम्यातील अटींची पूर्तता केली नसल्याने आजवर रोष होता. मात्र या करारनुसार मोबदला देण्याचे कंपनीने मान्य केल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
बरांज प्रकल्पग्रस्तांना मिळणार नव्याने एकरी चार लाखांचा मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 01:44 IST