विविध विषयावर मंथन : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढाऱ्यांचे मार्गदर्शनबल्लारपूर : बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी या नावाने उदयाला आलेल्या पक्षाने नागपूरहून काढलेल्या विदर्भ संघर्ष यात्रेचा येथे बुधवारी समारोप झाला. यानिमित्त येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अॅड. सुरेश माने होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर दशरथ मडावी, कादिरभाई, सिद्धार्थ पाटील, अशोक वनकर, गोपाल मेंढे, बल्लारपूर न.प.चे उपाध्यक्ष संपत कोरडे, नगरसेवक राजू झोडे, विक्की दुपारे, गणेश कोकाटे, वंदना तामगाडगे यांची उपस्थिती होती.विदर्भ राज्य निर्मिती, प्रत्येक शेतकऱ्याला व शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर निवृत्ती वेतन म्हणून प्रतिमाह चार हजार रुपये मिळावेत, खासगी उद्योगात आरक्षण, मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण, बहुजन विद्यार्थी धोरणात बदल या यासह मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने नागपूरहून ही संघर्ष यात्रा काढली. विदर्भातील विविध ठिकाणांहून येत माता जिजाऊ जयंती दिनी मंगळवारी यात्रा बल्लारपुरात पोहचली. यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात वरील मुद्यावर नेत्यांनी जोरकस भाषणे दिली. कादिरभाई यांनी विदर्भ राज्य वेगळा का हवा, याचे विश्लेषण करीत शासनकर्ते विदर्भावर कसा अन्याय करीत आहेत, याचे आकड्यांसह विवेचन केले. दशरथ मडावी हे प्रखर व तितक्याच मुद्देसूद भाषणातून आदिवासींच्या समस्यांवर पोटतिडकीने बोलले. भाजपा शासनावर ताशेरे ओढले व आदिवासींचे नाव बदलवून त्या जागी ‘वनवासी’ नाव ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव कोणता, याचे विश्लेषण करीत भाजपाच्या तुलनेत काँग्रेस शासन काही अंशी चांगले होते अशी पुस्ती जोडली. सिद्धार्थ पाटील यांनीही विविध विषयाला स्पर्श करीत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न विस्तृतपणे मांडला. त्याचप्रमाणे सध्याची बहुजन समाजवादी पार्टी ही आंबेडकरी विचारापासून दूर जात असल्याने तो पक्ष सोडून आम्ही हा नवीन पक्ष स्थापन केला असल्याचे स्पष्ट करीत या पक्षाचे ध्येय धोरणे काय, ते सांगितले. माने यांनी पक्षाची भूमिका विषद करीत आंदोलनाचा पुढील टप्पा कोणता याची रूपरेषा मांडली. (तालुका प्रतिनिधी)
बरिसोपाच्या संघर्ष यात्रेचा बल्लारपुरात समारोप
By admin | Updated: January 17, 2016 00:52 IST