निवेदन दिले : रिपब्लिकन संघर्ष समितीची मागणीबल्लारपूर : ‘मनुस्मृती’ या वादग्रस्त ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून त्याचे प्रकाशन केले जाणार आहे. रिपब्लिकन संघर्ष समितीने या ग्रंथाच्या प्रकाशनाला विरोध केला असून त्या संदर्भाचे निवेदन येथे नायब तहसीलदार सचिन अहीर यांना कार्यकर्त्यांनी दिले आहे.मनुस्मृतीमध्ये शूद्रांना शिक्षणाच्या, धनसंपत्ती, स्वरक्षण, स्वत:ची प्रगती एवढेच नव्हे तर अन्न, वस्त्र, निवारा यांचेही अधिकार नाकारण्यात आले आहेत. स्त्रियांचा तर या ग्रंथामध्ये जागोजागी अपमान करण्यात आला आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनावर महाराष्ट्रात १० वर्षांपासून बंदी आहे. असे असतानाही त्याचे प्रकाशन केले जात आहे. सदर ग्रंथाच्या प्रकाशनामुळे शांत असलेल्या समाजात परस्पर विद्वेषाची बीजे पेरून जातीय वातावरण दूषित होण्याची भीती आहे. सबब, या ग्रंथाचे प्रकाशन थांबवावे. तसेच, अशा असामाजिक तत्त्वांना खतपाणी घालू इच्छिणाऱ्या व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शासनाकडून या संबंधात कारवाई न झाल्यास आंबेडकरवादी व पुरोगामी संघटना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना भारत थुलकर, अरुण लोखंडे, संजय डुंबेरे, अविनाश नगराळे, राकेश साठे, आंबेडकर मून, ताई फुलझेले, रेखा मेश्राम, सत्यभामा भाले, वत्सला तेलंग, वसंत नमनकर, रेखा सातपुते, सविता रामटेके, कौशल्या घागरगुंडे, जीवनधारा कांबळे आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
मनुस्मृतीच्या प्रकाशनावर बंदी आणा
By admin | Updated: March 14, 2016 01:12 IST