विदर्भातून प्रथम राहू : महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला विश्वासबल्लारपूर : शासनाने गावापासून देशपातळीवर स्वच्छता मिशन सुरू केले. या अभियानांतर्गत संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे ध्येय आहे. यासाठी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प असून विदर्भात बल्लारपूर हागणदारीमुक्तीत पहिल्या स्थानावर राहणार, असा विश्वास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गुरुवारी विसापूर येथे व्यक्त केला.विसापूर ग्रामपंचायतीच्या प्रांगणावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. यात हागणदारी मुक्त गाव अभियानात उत्कृष्ट कार्य करणारे बामणी (दुधोली) येथील सरपंच सुजाता टिपले, आमडीच्या सरपंच अर्चना सुरेश वासाडे, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी आणि दत्तक कुटूंब घेवून शौचालय बांधकाम करून देणारे जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांचा शाल, श्रीफळ व वृक्ष प्रदान करून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन विसापूर येथील सरपंच रिता जिलटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीच्या सभापती चंद्रकला बोबाटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, उपसरपंच सुनील रोंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अंकुश केदार, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, मनुष्यबळ विकास तज्ञ बी.के. हिरवे, राज्य समन्वयक महेश कोडगिरे, विसापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कुकडपवार, सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी आर. एम. सोनसुल, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, ग्रामविकास अधिकारी मोरेश्वर कोमटी यांची उपस्थिती होती.याप्रसंगी शौचालय बांधकाम करुन वापर करीत असल्याबाबत प्रेरणा देणारे लाभार्थी आनंदराव परचाके, ललीता पोरटे, वच्छला आत्राम व संध्या नागापूरे यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आले. प्रास्ताविक संध्या दिकोंडवार यांनी केले. संचालन सरोज नागातुरे यांनी तर आभार मुकेश भालेराव यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
बल्लारपूर तालुक्याने केला हागणदारीमुक्तीचा संकल्प
By admin | Updated: November 22, 2015 00:48 IST