विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पाेडे), हडस्ती, काेर्टिमक्ता, कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, मानाेरा व गिलबिली ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक हाेत आहे. साेमवारी १३ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. हडस्ती ग्रामपंचायतीत ६, तर गिलबिली ग्रामपंचायतीत ३ उमेदवारांनी अविराेध निवडणूक जिंकली आहे. आता बल्लारपूर तालुक्यात ८३ जागांसाठी २५८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. कुठे सरळ, कुठे तिरंगी, तर कुठे बहुरंगी निवडणुकीचे चित्र आहे.
अविराेध निवडून आलेले उमेदवार भाजपप्रणित आघाडीचे असल्याचा दावा भाजपने केला आहे.
विसापूर ग्रामपंचायत सर्वांत मोठी आहे. येथे केवळ २ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, १७ जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात आहेत. नांदगाव (पाेडे) ग्रामपंचायतीच्या ४ प्रभागात ११ जागांसाठी ३४ पैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने २७ उमेदवारांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. काेर्टिमक्ता ग्रामपंचायतीच्या ३ प्रभागातील ७ जागांसाठी १५ उमेदवार निवडणूक रणसंग्रामात उतरले आहेत. कळमना ग्रामपंचायतीमध्ये एकूण ३ प्रभागातून ९ जागांसाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत कायम आहेत. येथे केवळ १ अर्ज मागे घेतला आहे.
पळसगाव येथील ३ प्रभागातील ९ जागांसाठी १९ उमेदवार लढा देत आहेत. आमडीमध्ये ३ प्रभागातून ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. किन्ही ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभागातून ७ जागांसाठी २० उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. येथे बहुरंगी लढतीचे चित्र आहे. गिलबिली ग्रामपंचायतीमध्ये २ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, ३ उमेदवारांनी अविराेध निवडणूक जिंकली आहे. येथे १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मानाेरा ग्रामपंचायतीमध्ये ३ प्रभागातील ९ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक लढत आहेत.
बॉक्स
हडस्तीत एका जागेसाठी निवडणूक
बल्लारपूर तालुक्यातील शेवटच्या टाेकावर हडस्ती ग्रामपंचायत असून, ७ सदस्य संख्या आहे. येथील निवडणूक अविराेध हाेण्याची शक्यता असताना प्रभाग क्रमांक २ मध्ये दोन उमेदवारांत शेवटच्या क्षणापर्यंत मनोमीलन झाले नाही. येथे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने केवळ एका जागेसाठी निवडणूक घेण्याची वेळ तहसील प्रशासनावर आली आहे. प्रभाग क्रमांक १ मधून माराेती विश्वनाथ पारखी, मंगला संजू थिपे, मंजुषा नागेंद्र आगिरकर, प्रभाग क्रमांक २ मध्ये सुमित्रा प्रकाश ढाेबे, प्रभाग ३ मधून सचिन आनंदराव थिपे व अंजली गुरूदास पारखी अविराेध निवडून आले.
बॉक्स
अविराेध निवडून आलेल्या भाजप उमेदवारांचा जल्लोष
हडस्ती ग्रामपंचायतीमध्ये एकूण ७ जागांपैकी ६ उमेदवार अविराेध निवडणूक जिंकले. गिलबिली ग्रामपंचायतीमध्ये ३ उमेदवार अविराेध निवडून आले. याचा जल्लोष भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर पंदिलवार, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हरीश गेडाम, माजी सभापती गाेविंदा पाेडे, भाजपचे तालुका सरचिटणीस रमेश पिपरे, रूपेश पाेडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू बुद्धलवार आदींनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना भाजपचे दुप्पटे देऊन स्वागत केले. हडस्ती व गिलबिली ग्रामपंचायतीमध्ये अविराेध निवडून आलेले सदस्य भाजपचे असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.