चंद्रपूर: चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी चंद्रपुरातील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाला २५ हजारांची लाच मागणाऱ्या कोरपना पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलिम खान पठाण याला अटक करण्यात आली. ही कारवाई वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.चंद्रपुरातील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस बुधवारी कोरपना येथे पोहचली. यावेळी कुण्यातरी अज्ञात इसमाने सदर बसमध्ये चोरीचा माल असल्याची माहिती कोरपना पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सलिम खान पठाण याला दिली. माहिती मिळताच, सलिम खान याने सदर बसची झडती घेतली. मात्र बसमध्ये कोणताही चोरीचा माल मिळाला नाही. मात्र तरीही सलिम खान याने ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान, ट्रॅव्हल्स कंपनीच्या संचालकाने १५ हजार रुपये देण्याचे कबुल करून यासंदर्भात वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची दखल घेत, गुरूवारी कोरपना येथे सापळा रचला. दुपारनंतर एसीबीच्या पथकाने सलिम खानला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. रात्री उशिरापर्यंत एसीबीच्या अधिकाऱ्याकडून त्याची चौकशी सुरू होती. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)
लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अटकेत
By admin | Updated: November 6, 2015 02:17 IST