चंद्रपूर : दारुबंदी झाल्यानंतर जिल्ह्याचे स्वरुप काय असेल, कोणती परिस्थिती उद्भवेल, अवैध मार्गाने दारू येतील का, व्यसनाधिन युवकांचे काय असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. मात्र यावरही उपाय आहे. दारुबंदी झाल्यानंतर व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. बोलक्या भिंती उपक्रम याच उपक्रमातील एक मैलाचा दगड ठरत आहे.चंद्रपूर जिल्हा दारुबंदीचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला. आता व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी आम्ही चंद्रपूरकर, शील नाट्य पथनाट्य संस्था आणि श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय या तीन संस्थांनी व्यसनमुक्त समाजासाठी बोलक्या भिंती उपक्रम राबविला आहे. व्यसनामुळे समाजामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. अनेकांचे संसार उद्वस्थ झाले आहे. मुलांना वडील, काका, मामा एवढेच नाहीतर आईला तिच्या मुलाला मुकण्याची वेळ व्यसनामुळे येत आहे. त्यामुळे व्यसनापासून प्रत्येकांनी दूर राहिल्यास कुटुंब, गाव, देश सर्वांचे भले होणार आहे.हाच संदेश विद्यार्थ्यांनी भिंती रंगवून समाजाला दिला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कलावंत भिंती चितारत असताना नागरिकांनी उत्सुकतेपोटी गर्दी केली होती.(नगर प्रतिनिधी)
कलावंतांनी साकारले दारुबंदीनंतरचे भावविश्व
By admin | Updated: January 27, 2015 23:29 IST