नगर पालिकेत खळबळ : जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीसवरोरा : भाजपाप्रणित आघाडी करून त्यात भाजपा नगरसेवकांसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सहभागी करून घेतल्याच्या मुद्यावरुन वरोरा नगराध्यक्षासह आघाडीतील १३ नगरसेवकांवर अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी चंद्रपूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत नगराध्यक्षांसह १३ नगरसेवकांना नोटीस बजाविली असल्याने पालिका वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.गटाची नोंदणी करताना नगराध्यक्ष एहेतेश्याम अली यांनी भाजपाचे सर्व दहा नगरसेवक, इंदिरा काँग्रेसचे दोन नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाला आघाडीत समाविष्ठ केले. अशाप्रकारे गटाची नोंदणी करून पक्षांतर बंदी कायदा अनर्हतेचे उल्लंघन झाले असल्याची तक्रार अर्जाद्वारे इंदिरा काँग्रेसचे नगरसेवक विठ्ठल टाले यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८७ चे कलम सात व सहकलम ३, ४, ५ व ६ अन्वये अर्ज दाखल करून नगराध्यक्ष अहेतेश्याम अली व १३ नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवक टाले यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या अर्जावरून नगराध्यक्ष अली यांच्यासह भाजपा नगरसेवक अक्षय भिवदरे, मनिषा मेश्राम, ममता मरस्कोल्हे, सुनीता काकडे, रेखा समर्थ, अनिल साकरिया, गुणानंद दुर्गे, दिपाली टिपले, दिलीप घोरपडे, सरला तेला, इंदिरा काँग्रेसचे नगरसेवक अनिल झोटींग, मंगला पिंपळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप बुरला यांना नोटीस बजाविल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजाविल्यामुळे वरोरा न.प. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना आघाडीत घेतल्याने एका स्वीकृत सदस्यास काँग्रेसला मुकावे लागले होते. काँग्रेस नगरसेवक अनिल झोटींग व मंगला पिंपळकर यांनी पक्षाचा व्हीप झुगारून उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदान केल्याचे प्रकरण यापूर्वीच काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केले होते. या दोन्ही प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी २८ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नगराध्यक्षांसह १३ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी अर्ज
By admin | Updated: February 23, 2017 00:35 IST