युवा कृती समितीची लढा : सर्वसामान्य प्रश्नही कृती समिती लावून धरणारब्रह्मपुरी : सन २०१६ ते २०२० या चार वर्षांकरिता ब्रह्मपुरी नगरपालिकेने मालमत्ता करात भरमसाठ वाढ करून ठेवली आहे. ही वाढ कमी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ब्रह्मपुरी जिल्हा युवा कृती समितीने नगरपरिषदचे मुख्याधिकारी मंगेश खवले यांना दिले आहे.ब्रह्मपुरी नगरपरिषदेने २०१६ ते २०२० पर्यंत मालमत्ता कराची आखणी करून नुकतेच सर्व नागरिकांना त्या संदर्भात नोटीसच्या माध्यमातून सूचित केले आहे. तसेच यावर आक्षेप असल्यास २२ आॅक्टोबरपर्यंत तो दाखल करण्याचे आवाहनसुद्धा केले आहे. परंतु ही बाब ब्रह्मपुरीत नागरिकांकडून चर्चील्या जात असल्याने व नागरिकांची ही समस्या असल्याचे लक्षात घेऊन ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण युवा कृतीने त्याची दखल घेतली व लगेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात वाढीव कर अवाजवी असल्याने त्याची पूनरमोजणी व्हावी. शक्य तेथे मालमत्ता कर कमी करावे, वाढीव दर कमी करून मालमत्ता कर कमी करावा इत्यादीच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ही कृती समिती केवळ ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीसाठीच काम करीत नसून इतर अनेक गोष्टींसाठी लढा देत आहे. शैक्षणिक, सामाजिक, समस्या सोडविण्याचेही कार्य करीत असल्याने या कृती समितीच्या कार्याप्रति नागरिकांच्या आदराच्या भावना व्यक्त होताना दिसून येत आहेत. सदर मागण्याचे निवेदन देताना प्रा. सुयोग बाळबुद्धे, स्वप्नील अलगदेवे, मोहित चंदनखेडे, तुषार साखरकर, नरू नरड, रोहित सिंहगडे, रोहित अरगेलवार, प्रांजल माकोडे, अभिषेक रोहणकर, आकाश खरकाटे व कृती समितीचे अन्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मालमत्ता वाढीव कराच्या विरोधात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
By admin | Updated: October 22, 2016 00:51 IST