साथीचा विळखा : उपचारादरम्यान घडली घटना लक्कडकोट : आदिवासी बहुल जिवती तालुक्यात आणखी एका बालका मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र साथीच्या आजारांचा संचार सुरू आहे. जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील आठ वर्षीय बालकाचा मलेरियामुळे गुरुवारी मृत्यू झाला. वेळेवर उपचार न मिळाल्याने ही घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होताच साथीच्या रोगांनी झडप घातली आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती, कोरपनासारखे आदिवासी बहुल लोकसंख्येचे तालुके आहेत. या तालुक्यांमधील दुर्गम गावांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचत नाही. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावल्यानंतरच ते ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचत असतात. जिवती तालुक्यातील पल्लेझरी येथील दिनेश गुंगाजी मोरताटे (८) याच्यावर गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. दिनेश मोरताटे याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. तो हगवण आणि ओकारीमुळे बेजार झाला होता. त्याची प्रकृती बुधवारी रात्री आणखी खराब झाली. गावावरून रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. परिणामी त्याला पहाटेपर्यंत घरीच ठेवण्यात आले. त्याला गुरुवारी पहाटे ४ वाजता पाटण येथे आणल्यावर खासगी वाहनाने सकाळी ७ वाजता गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची स्थिती अत्यंत नाजूक होती. पल्लेझरी गावातून गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रूग्ण दाखल होत आहे. या परिसरात मलेरिया, डायरियाची साथ पसरली आहे. दिनेशला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा प्रयोगशाळा उघडली नव्हती. त्यामुळे त्याच्या रक्ताची तपासणी झाली नाही. दिनेशच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला आहे. आता कुटुंबामध्ये आई असून ती एक हाताने अपंग आहे. दोन बहिणीसह दिनेश एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे त्याच्या मृत्युमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. (वार्ताहर) बोगस डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शनचा परिणाम राजुरा तालुक्यातील लक्कडकोट येथे बोगस डॉक्टरच्या इंजेक्शनमुळे तीन महिलांचा मृत्यू झाला होता. त्याच बोगस डॉक्टरच्या इंजेक्शनमुळे कोष्टाळा येथील कैलास निब्रत (५५) यांना गाठ आली होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. बोगस डॉक्टर भुपाल याने इंजेक्शन लावल्यावर कैलास निब्रत यांना इन्फेक्शन झाले होते, असे त्यांचा मुलगा नीतेश निब्रत याने सांगितले. तीन महिलांच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टर भुपाल याच्याविरोधात वैद्यकीय अधिकारी डॉ. अहीरकर यांनी १५ जुलै रोजी विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विरूरच्या ठाणेदारांनी बोगस डॉक्टरच्या घरावर धाड टाकून एक लाख रुपयांची औषधी जप्त केली होती. त्यानंतर त्या बोगस डॉक्टरला तेलंगनामधील करीमनगर येथून अटक करण्यात आली होती.
आदिवासी तालुक्यात आणखी एकाचा मृत्यू
By admin | Updated: August 12, 2016 01:02 IST