चंद्रपूर : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती भद्रावती अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना मुरसा येथे गाय, बैल, म्हैस तसेच तीन महिन्यांवरील सर्व जनावरांना आधार कार्ड (बिल्ला) टोचण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे जनावरांना ओळख निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे खरेदी-विक्री, औषधोपचारासाठी हा बिल्ला लावून असणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील पशुधनाला १०० टक्के बिल्ले टोचण्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश सोमनाथे यांनी निश्चित केले आहे. त्यामुळे विभागाने तशी तयारी सुरू केली आहे. जनावरांच्या कानात बिल्ला असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा लाभ पशुपालकांना मिळणार नसून, भविष्यात जनावरांच्या कानात बिल्ला असल्याशिवाय खरेदी-विक्री होणार नाही. जनावरास नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू आल्यास संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावर मृत पावल्यास, जनावर विजेचा धक्का लागून दगावल्यास नुकसान भरपाई मिळण्यास यामुळे सुलभ होणार आहे. कानात बिल्ला असल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधोपचार व प्रतिबंधक लसीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे. देशातील सर्व जनावरांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे. भविष्यात जनावरांची ऑनलाईन खरेदी-विक्री होऊ शकते. आपल्या अनमोल जनावरांना आधार कार्ड (बिल्ला) टोचून घ्यावा, असे आवाहन डॉ. नंदकिशोर मैंदळकर यांनी केले.