गडचांदूर येथील घटना : वीज खंडित करायला गेला होता वीज कर्मचारीगडचांदूर : गडचांदूर येथील एका शेतकऱ्याचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीजजोडणी खंडित करायला गेलेल्या वीजतंत्रीच्या मागे शेतकरी कुऱ्हाड घेऊन धावले. ही घटना शुक्रवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे गडचांदुरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचेच कंबरडे मोडणारा निघाला. अत्यल्प पाऊस, सिंचनाचा अभाव, पिकांवर रोगराई यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. यात शासनानेही पिकांना अत्यल्प हमीभाव जाहीर केला आहे. शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असताना वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिलाचा भरणा करण्याचा तगादा सुरू केला आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणांचा शेतकऱ्यांना वैताग आला असून याचेच पडसाद या घटनेत उमटल्याचे बोलले जात आहे.अशोक निळकंठ एकरे असे सदर शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे घराचे वीज बिल थकीत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून अनेक नोटीस दिल्यानंतरही वीज बिल न भरल्यामुळे कारवाई करायची म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ गडचांदूरचे कनिष्ठ वीज तंत्रज्ञ विनोद कुकडे यांनी एकरे यांचे घर गाठले. सुरुवातीला विजेच्या खांबावरून एकरे यांचा वीज पुरवठा खंडित केला. घरचे मीटर काढायला गेल्यानंतर अशोक एकरे यांनी बिल भरण्यासाठी पुन्हा मुदत मागितली. तरीसुद्धा मीटर काढल्याने सदर शेतकऱ्याचा राग अनावर झाला. त्यामुळे शेतकऱ्याने चक्क कुऱ्हाड घेऊन वीज तंत्रज्ञावर हल्ला चढविला. वीज तंत्रज्ञ यामुळे भांबावून गेले व ते पळू लागले. तरीही शेतकऱ्याने त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. दिवाळी ऐन तोंडावर आली असताना कापूस संकलन केंद्र सुरु झाले नाही. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्यामुळे आधीच अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असताना वीज वितरण कंपनीने कारवाईचे सत्र सुरु केले आहे. सतत वीज पुरवठा खंडित होणे व शेतातील भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना वारंवार बसत आहे. अनेक तक्रारी करूनसुद्धा उपाययोजना शून्य असल्यामुळे आधीच शेतकरी वैतागले आहे. असे असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून होत असलेली कारवाई शेतकऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचे दिसत आहे. वीज वितरण कंपनीच्या विरोधात अशोक एकरे या शेतकऱ्याने घेतलेल्या पवित्र्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. वीज तंत्रज्ञ विनोद कुकडे यांच्या तक्रारीवरून अशोक एकरे यांच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)
अन् शेतकरी कर्मचाऱ्याच्या मागे कुऱ्हाड घेऊन धावला
By admin | Updated: November 7, 2015 00:40 IST