लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड परसोडी हा रेल्वेलाईनवरून जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने मागील काही वर्षांपासून बंद केला आहे. तरीही या रस्त्यावरून एकाने टाटा सुमो हे वाहन टाकण्याचे धाडस केले आणि ते रेल्वे रूळात अडकले. नेमकी त्याचवेळी नागभीडवरून नागपूरला जाणारी रेल्वे आली. पण प्रसंगावधान राखून काहींनी या गाडीला लाल रंगाचे दुपट्टे दाखवले आणि मोठा अनर्थ टळला.याबाबत प्राप्त माहितीनुसार येथील पंचायत समितीच्या मागील बाजूने नागभीडमधून निघणारा रस्ता चिखलपरसोडीकडे जातो. हा रस्ता रेल्वे लाईन ओलांडून जात असल्यामुळे काही अप्रिय घटना घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी हा रस्ता बंद केला आणि अवागमनासाठी पर्यायी रस्ता तयार केला. पर्यायी रस्ता असूनही एका वाहनचालकाने आपले टाटा सुमो हे वाहन नेमके येथूनच टाकले आणि हे वाहन रेल्वे रूळात अडकले.नेमक्या त्याच वेळी नागभीड येथून दुपारी १२.४५ वाजता सुटणाऱ्या रेल्वे गाडीने नागभीड रेल्वे स्टेशन सोडले आणि ज्या ठिकाणी टाटा सुमो हे वाहन अडकले होते, त्याच्या अगदी टप्यात आले. आता मात्र वाहनात बसलेल्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांनी वाहनातून पटापट उड्या टाकून रेल्वेला लाल रंगाचा दुपट्टा दाखवला व रेल्वे थांबवली आणि लगेच धक्का मारून ते वाहनही रेल्वे रूळातून बाहेर काढले.
अन् अनर्थ टळला
By admin | Updated: May 23, 2017 00:28 IST