लोकमत इम्पॅक्ट
बल्लारपूर : येथील नगरपालिका ते गोलपुलिया या दुपदरी मार्गावर रोज भरत असलेल्या बाजारामुळे ‘दुपदरी मार्ग झाला एकेरी’ या मथळ्याखाली ही जनसामान्यांची समस्या ‘लोकमत’ने बुधवारी बातमीच्या माध्यमातून प्रकाशित केली होती. बातमी प्रकाशित होताच प्रशासन जागे झाले. तत्काळ त्यांनी कार्यवाही करत भर रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराला पर्यायी जागा देऊन हा दुपदरी मार्ग मोकळा केला आहे.
नगरपालिका ते गोलपुलिया हा दुपदरी रस्ता नेहमीच वर्दळीचा असतो. वेकोलिमुळे जड वाहनांचीसुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. भररस्त्यावर रोज भरणाऱ्या बाजारामुळे या मार्गावरील वाहतूक एकतर्फी करण्यात आली होती. ‘लोकमत’ने जनसामान्यांची ही समस्या प्रकाशित केली. या बातमीची दखल घेत प्रशासनाने भाजीबाजाराला तत्काळ पर्यायी जागेची व्यवस्था करून दिली असून, हा मार्ग आता परत दुपदरी वाहतूक करता मोकळा झाला आहे.