वरोरा : येथील पंचायत समितीची इमारत जनपथकालिन होती. या जीर्ण इमारतीत मागील अनेक वर्षांपासून पंचायत समितीचा कारभार चालत होता. आता नव्याने इमारत बांधण्यात येणार असल्याने जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. परिणामी सभापती, उपसभापती यांच्या दालनासह पंचायत समितीचे सर्वच विभाग एकाच सभागृहात समाविष्ट करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयीन कामासाठी येणाऱ्यांची चांगलीच कुंचबना होत असल्याचे दिसून येत आहे.वरोरा पंचायत समितीची इमारत जनपथ काळात तयार करण्यात आली. काळानुसार विभाग वाढले. त्यानुसार त्याच परिसरात इमारती तयार करून कामकाज चालविण्यात येत होते. या सर्वच इमारती आता जीर्ण झाल्या. पावसाळ्यातील गळतीमुळे कागदपत्रे भिजण्याचा प्रकारही घडत होता. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दस्ताऐवज सांभाळताना चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यामुळे शासनाच्या पंचायत विभागाने नवीन इमारत बांधकाम मंजूर केले असल्याने जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या आवारात असलेल्या सभागृहात सभापती, उपसभापती यांचे कक्ष व पंचायत समितीतील बहुतांश विभाग सुरू करण्यात आले आहे. ही जागाही अपुरी पडत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना बसण्याकरिता जागाही मिळाली नसल्याचे चित्र आहे.मागील काही दिवसांपासून पंचायत समितीच्या अनेक विभागाचे कामकाज रेंगाळले असल्याचे दिसून येत आहे. संगणक लावतानाही कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. सर्व विभागाचे दस्तावेजाचे गठ्ठे बांधून ठेवण्यात आले आहे. हे दस्ताऐवज गठ्ठयातून सोडून कुठे ठेवावा, या विवंचनेत कर्मचारी सापडले आहेत. पंचायत समितीमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एकाच सभागृहात अनेक विभाग एकत्र आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सर्व विभाग एकाच सभागृहात
By admin | Updated: May 8, 2015 01:12 IST