वलनी येथील घटना : एकाचा मृत्यू तर १० प्रवासी गंभीर जखमीतळोधी (बा.) : तळोधी (बा.) पासून चार किलोमिट अंतरावर असलेल्या वलनी या गावाजवळ प्रवासी घेवून जाणाऱ्या अंजनी ट्रॅव्हल्सची झाडाला धडक बसली. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर चालकासह १० प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना आज शनिवारी घडली. चक्रधर वसंता खोब्रागडे (३०) रा. तळोधी (बा.) असे मृताचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास नागपूर- मूल अंजनी ट्रॅव्हल्स (क्रमांक एम.एच.३१- सी. १०११) प्रवासी घेवून सुसाट वेगाने मूलकडे जात होते. या ट्रॅव्हल्सचा चालक मद्य पिऊन असल्याचे समजते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वलनी गावाजवळील एका सिंदीच्या झाडाला त्याने धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, ट्रॅव्हल्ससमोरील भागाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आणि चालकाजवळील कॅबीनमध्ये बसलेल्या दिलीप तातोबा उपरीकर (५०) ,बंडू मनोहर कोहिले (४५), बंजू नारायण गेडाम (५०), पार्वताबाई जयंत कटारिया (५०), जयंतीभाई माधव कटारिया (५५), पार्वता शंकर मेश्राम (४०), चक्रधर वसंता खोब्रागडे (३०), नारद तिवारी, सोमदेव बाबुलाल नान्हे, राजेश सतीबावणे आदी गंभीररित्या जखमी झाले. यात चक्रधर वसंता खोब्रागडे व नारद तिवारी हे दोघेही कॅबीनमध्ये बसलेले असताना हे दोघेही कॅबीनच्या डाव्या बाजुला फसले. हे दोघे प्रवासी बाहेर निघू शकत नव्हते. त्यांना पाणी पाजत गॅस वेल्डींगच्या सहाय्याने टिनाचे चादर कापून काढण्याचा प्रयत्न केला.एक तास प्रयत्न करुनसुद्धा प्रवासी निघू शकले नाही. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅव्हसचा समोरील भाग उचलून चालक व कॅबीनमध्ये फसलेल्या प्रवाशांना काढण्यात यश आले. चक्रधर खोब्रागडे व नारद तिवारी या दोघांच्या पायाला गंभीर जखम असल्याने त्यांना गडचिरोलीला हलविण्यात आले. काही जखमी प्रवाशांना प्राथमिक स्वास्थ्य केंद्र तळोधी (बा.) येथे उपचाराकरिता हलविण्यात आले तर काही प्रवाशांना चंद्रपूरला हलविण्यात आले. यावेळी सिंदेवाही व नागभीड येथून जखमी प्रवाशांना हलविण्यासाठी १०८ क्रमांकावरील तीन अॅम्बूलन्स उपलब्ध झालेल्या होत्या. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनवणे यांच्या मार्गदर्शनात अनिल आंबेकर, पोलीस हवालदार झलके, सहाय्यक फौजदार वंजारी, जगनसिंह साथी यांनी मदत केली. अंजनी ट्रॅव्हल्सच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चक्रधर वसंता खोब्रागडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. (वार्ताहर)
अजनी ट्रॅव्हल्सची झाडाला धडक
By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST