शंकरपूर : मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी साठगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेत न येण्याचा निर्णय घेतला होता. सलग पाच दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. अखेर शिक्षण विभागाने नमते घेत मुख्याध्यापक चव्हाण पुन्हा शाळेवर येणार नाही, अशी हमी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले आहे. साठगाव येथील जिल्हा परिषद शाळेत ११७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकासह इतर शिक्षकावर गंभीर आरोप करत शाळेत येणे बंद केले होते. शाळा व्यवस्थापन समितीसह गावातील प्रतिष्ठीत नागरिकांनीही गत दोन वर्षांपासून शाळेविषयी तक्रारी केल्या होत्या. पण तक्रारीची दखल घेण्यात येत नव्हती. अखेर पालकांनी १६ आॅगस्टपासून मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. १६ ते २१ आॅगस्टपर्यंत शाळेत एकही विद्यार्थी न आल्याने चिमूरचे संवर्ग विकास अधिकारी विजय जाधव, गटविकास अधिकारी के.जी. पिसे, केंद्रप्रमुख टी.आर. महाल्ले यांनी शाळेला भेट दिली. भेटीदरम्यान गावातील शिष्टमंडळाशी चर्चा करून विद्यार्थी व शिक्षकांचे मत जाणून घेतले. पालकांची मागणी लक्षात घेवून मुख्याध्यापक बी.टी. चव्हाण पुन्हा या शाळेवर येणार नाही, असे आश्वासन दिल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय मागे घेतला असून आता शाळा नियमीत भरणार आहे. (वार्ताहर) ‘तो’ बनला दोन तासांसाठी शिक्षक ४मुख्याध्यापकाच्या बदलीसाठी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. १६ ते २० आॅगस्टपर्यंत विद्यार्थी शाळेत गेलेच नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही समस्या जाणून घेत ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने आपल्या पातळीवर शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी सकाळी राजीव गांधी सभागृहामध्ये शाळा भरली. तिथे शिक्षक म्हणून गावातील उच्च शिक्षित रमन मारोतराव ढोरे या युवकाची निवड करण्यात आली. सकाळी १० वाजतापासून १२ वाजेपर्यंत रमन यांनी विद्यार्थ्यांना धडे दिले. गावातील नागरिक व विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून मुख्याध्यापक बी.टी. चव्हाण पुन्हा या शाळेवर कार्यरत राहणार नाही. त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाहीसाठी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल. - विजय जाधव संवर्ग विकास अधिकारी, चिमूर
आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांपुढे शिक्षण विभाग झुकले
By admin | Updated: August 23, 2016 01:18 IST