आमदार अॅड. एकनाथ साळवे यांनी महाराष्ट्रात अनेक माणसे जोडली. पक्षीय बांधिलकीच्या पलीकडे जाऊन सामाजिक न्यायासाठी पुरोगामी चळवळींना ताकद दिली. भारतीय संविधानातील जीवनमूल्यांची समाजमनात पुनर्स्थापना व्हावी, यासाठी १९७० च्या दशकात राजुरा येथे दहा दिवसीय संस्कार शिबिरांचे आयोजन सुरू केले. या शिबिरात महाराष्ट्रातील नामवंत विचारवंतांनी उपस्थिती दर्शविली. यातून सत्यशोधक चळवळीला वाहून घेणारी तरुणाई पुढे आली. नवोदितांना विविध विषयांवर लिहिते करण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने अनेक संमेलने घेतली. आमदारकीच्या अहंकाराचा वारा त्यांना कधी शिवला नाही. त्यामुळे चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांशी त्यांनी आयुष्यभर सहज संवाद सुरू ठेवला. फुले, आंबेडकर व मार्क्सवादी विचारांचे कालसाक्षेप पाईक होते. गांधी-नेहरू विचारांची काँग्रेस पक्षीय मूल्ये स्वीकारूनही अॅड. साळवे हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून वावरले. तत्कालीन अनेक मोठे नेते व शरद पवारांशी अत्यंत स्नेहाचे संबंध असतानाही त्यांनी स्वहिताचा विचार केला नाही. त्यामुळे ॲड. एकनाथ साळवे हे प्रामाणिक लोकनेते म्हणून कायम स्मरणात राहणार आहेत.
आमराईतील आंदोलन गाजले
चंद्रपूर औष्णिक केंद्र उभारण्यासाठी ऊर्जानगर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. आमदार असताना याविरुद्ध अॅड. एकनाथ साळवे यांनी आमराईत बैठा सत्याग्रह केला होता. सरकारकडून मागणी मान्य झाल्यानंतर सत्याग्रहाची सांगता झाली. त्या आंदोलनामुळेच न्याय मिळाल्याची कृतज्ञता ऊर्जानगर परिसरात शेकडो शेतकरी आजही व्यक्त करतात.