मातेवर कोसळले आभाळ : न्यायासाठी आता केवळ संघर्ष
बी.यू. बोर्डेवार
राजुरा : घरात अठराविश्वे दारिद्र्य, पतीचे अनेक वर्षांपूर्वीच निधन झालेले. एक मुलगा आणि दोन मुली. दोन्ही मुलींचे लग्न उरकून आईने आपले कर्तव्य सांभाळले. एकुलता एक मुलगा आईसह कुटुंबाचाच आधार झाला. मात्र, रेल्वे पोलिसांच्या कोठडीत त्याचाही मृत्यू झाल्याचे ऐकताच या आईचे विश्वच अंधकारमय झाले. मुले आई-वडिलांचे छत्र गमावल्याने पोरकी होतात, हे ऐकले होते. मात्र, विरूर स्टेशन येथील ही आईच शासनाच्याच यंत्रणेमुळे पोरकी झाली आहे.
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या विमल गणपत मडावी या असाहाय मातेची ही कथा. तिला अरुणा आणि अश्विनी अशा दोन मुली आणि अनिल नावाचा एक मुलगा. मुले लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले. आई विमलने मोलमजुरी करून मुलांना शिकविले. दहावीपर्यंत शिकल्यानंतर मुलगा अनिल याने संसाराचा गाडा खांद्यावर घेतला. तो काम करून कुटुंबाला हातभार लावू लागला. अशातच दोन्ही मुलींचे लग्नही विमल मडावी यांनी उरकले. एकीला गावातच, तर दुसरीला चित्तूर येथे दिले. दरम्यान, अचानक काही रेल्वे पोलीस येतात आणि अनिल आणि गावातील तीन मुलांना उचलून नेतात. आई मुलगा कुठं गेला म्हणून इथेतिथे शोध घेऊ लागते. तीन दिवसांनंतर चित्तूर येथे राहणाऱ्या बहिणीला रेल्वे पोलीस फोन करून आधार कार्ड मागतात आणि दुसऱ्या दिवशी भाऊ अनिलसुद्धा बहिणीसोबत बोलतो. मला खूप मारत आहेत, मला वाचवा, असेही तो आपल्या बहिणीला सांगतो. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल मरण पावल्याचा निरोप पोलिसांकडून येतो. फिल्मी स्टाइल वाटावा, असा हा घटनाक्रम असला तरी या घटनेने आई विमलचे विश्वच हादरले. मुलाने काय केले, मुलाचा मृत्यू कशाने झाला, कुठलाही आजार नसताना पोलीस मुलाला फिट आल्याचे का सांगतात, असे नानाविध प्रश्न या आईच्या मनात घोंगावत आहेत. यात दोष कुणाचा, हे सीआयडीच्या तपासात समोर येईलच. मात्र, पतीचे निधन, मुलींचे लग्न झाल्यानंतर एकमेव आधार असलेल्या मुलाचाही असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ही आईच पोरकी झाली आहे.
बॉक्स
मृतदेह पाहून अश्रू अनावर
मुलाचा मृतदेह आई विमल मडावी यांच्या समोर आल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. मुलाच्या हातावर जखमा होत्या. हात चिरलेले होते. पायावर मारण्याच्या जखमा होत्या. मांडीवर काळे डाग होते, असे खुद्द ही आईच सांगते. मुलाला मरताना किती वेदना झाल्या असतील, याचा विचार करून ही माता सुन्न झाली आहे.