१ ते ३१ जुलैला विशेष मोहीम : प्रवेश अर्जासोबतच नमुना-६ मतदार नोंदणी अर्ज भरावा लागणारलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : निवडणुकांमधील मतदानाची टक्कवारी दिवसेंदिवस वाढण्याऐवजी कमी होत आहे, हे निवडणुकीच्या टक्केवारीवरून लक्षात येते. यासाठी नोकरदार वर्ग व युवक, युवती मतदानापासून दूर राहतात. त्यामुळे युवा मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी व नवयुवकांची मतदार संख्या वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबतच मतदार यादीत नाव नोंदविण्याचा ‘नमुना-६’ चा अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेताच विद्यार्थी आता देशाचा नवमतदार बनणार आहे.भारतीय लोकशाहीमध्ये नागरिकाच्या मतदानातून या देशाचे प्रधानमंत्रीपासून ग्रामपंचायतच्या सरपंचाची निवड केली जाते. यासाठी त्या नागरिकांचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे, त्याचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. काही वर्षाआधी २१ वर्ष वय पूर्ण झालेल्यांनाच मतदानाचा अधिकार होता. मात्र पंचायत राज व्यवस्थेत माजी प्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांनी युवकांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे, म्हणून १८ वर्षांपासून मतदानाचा अधिकार दिला. त्यामुळे राजकारणात युवा मतदारांसह युवा राजकीय पुढाऱ्याचे पीक यायला लागले.नवीन मतदाराच्या नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगामार्फत अनेक अभियान राबविण्यात येतात. मात्र वयाचे १८ वर्षे पूर्ण झालेले युवक तहसील कार्यालयात जावून मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जात नाही. त्यामुळे अनेक युवक मतदान प्रक्रियेतपासून दूर राहतात. नवयुवकांची मतदार संख्या वाढविण्यासाठी व युवक-युवतीचा राजकारणातील सहभाग घेण्यासाठी निवडणूक आयोगाने आता महाविद्यालयात प्रवेश अर्ज घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबतच नमुना-६ मतदार नोंदणी अर्ज देखील भरून घेण्यात येणार आहे. त्यामुळे युवा मतदारांना शासकीय कार्यालयात जावून मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तर ज्या नवयुवक-युवतीचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांकडून भावी मतदार म्हणून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे.या विशेष मोहिमेव्यतीरिक्त शासकीय आणि खाजगी शैक्षणिक संस्थामध्ये मतदार जनजागृतीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय संस्था या ठिकाणी प्रवेशाच्या वेळीच लोकसभा-विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्याच्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. त्यानुसार या विशेष मोहिमेसाठी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाची ‘नोडल’ अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.१ ते ३१ जुलैपर्यंत चालणाऱ्या या नवमतदार विशेष मोहिमेमुळे महाविद्यालयात प्रवेश घेताच मतदार यादीत नावे आल्याने युवा मतदाराच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. १ ते ३१ जुलै दरम्यान युवा मतदार नोंदणी अभियान महाविद्यालयात राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रवेश अर्जासह नमुना-६ हा मतदार यादीत नाव नोंदणीचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव नोंदवावे व अभ्यासक वृत्तीने मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा.- हरिष धार्मिक, उपविभागीय अधिकारी, चिमूर.
महाविद्यालयात प्रवेश घेताच विद्यार्थी बनणार मतदार
By admin | Updated: June 15, 2017 00:28 IST