मंडळ कार्यालयांना सील : १३ तारखेला चर्चेसाठी पाचारण चंद्रपूर : विदर्भ पटवारी आणि मंडळ अधिकारी संघाच्या जिल्हा शाखेने बुधवारी १० फेब्रुवारीपासून पुकारलेल्या बेमुदत लेखनीबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाचा कणा असलेल्या तलाठी आणि मंडळ कार्यालयांचे काम ठप्प पडले. या आंदोलनाला १२ तास उलटले असले तरी अद्याप कसलाही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारीला चर्चा करण्याचे निमंत्रण दिले असल्याने सध्या तरी हे आंदोलन सुरूच राहणार असे चित्र आहे.या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्वच तलाठी आणि मंडळ अधिकारी सहभागी झाले आहेत. यामुळे ठप्प पडले आहे. बुधवारी सकाळी तलाठ्यांनी आपली कार्यालये उघडलीच नाहीत. तर, मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालायाला सिल लावून त्याच्या किल्ल्या तहसीलदारांना सोपविल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बसून तलाठ्यांनी धरणे दिले.या आंदोलनामुळे महसूल विभागाचे ग्रामीण पातळीवरील काम ठप्प पडले आहे. निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दरम्यान, तलाठ्यांच्या पदोन्नतीसंदर्भातील काही प्रकरणे बुधवारी तातडीने निकाली काढण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आपल्या सर्व मागण्यांचा सहानुभूतीने विचार होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका संघाने घेतली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
तलाठ्यांच्या आंदोलनाने प्रशासकीय कामे ठप्प
By admin | Updated: February 11, 2016 01:20 IST