फौजदारी कारवाई : निवडणूक आयोगाचे पाऊलचंद्रपूर : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे मतदानासाठी टाळाटाळ करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.निवडणूकीच्या कामात कोतवालापासून तर जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळेच व्यस्त असतात. नागरिकांत मतदान जागृती करुन मतदान टक्केवारी वाढविण्याचे दरवर्षी प्रयत्न केले जात आहेत. सामान्य मतदारांची मतदानाची टक्केवारी वाढत असली, तरी प्रशासकीय कर्मचारीच निवडणूूक कामात असताना, मतदान करण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यावेळी निवडणूक आयोगाने मतदान कामात व्यस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागविली असूून त्यांचे मतदान ओळखपत्र, ओळखपत्र क्रमांक, यादी क्रमांकाची नोंद घेतली आहे. निवडणूक आयोगाचे हे पाऊल मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी असून, मतदान न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मतदान कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशासनाकडून इडीसी अर्ज, पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्याची कारवाई सुरु आहे. ज्यांना पोस्टर बॅलेट पेपर मिळाले नाही, त्यांना तहसील कार्यालयात बॅलेट पेपर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मतदान करतात की, नाही यावर लक्ष राहणार आहे. आपल्याच कर्मचाऱ्यांकडून मतदान होत नसल्याने निवडणूक आयोगाला फौजदारी कारवाईचे पाऊल उचलावे लागले असल्याचे सांगण्यात येते.(स्थानिक प्रतिनिधी)
मतदान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
By admin | Updated: October 11, 2014 23:01 IST