चंद्रपूर : सध्या काही शालेय विद्यार्थी व इतर काही वाहन चालक, मुले हे आपल्यावर कसल्याही प्रकारची पोलिसांकडून कारवाई होऊ नये, या हेतुने आपल्या दुचाकी वाहनाला अस्पष्ट नंबर, रंगबिरंगी नंबर प्लेट लावत आहेत. अनेकजण आपले दुचाकी वाहने भरधाव वेगाने चालवून धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करीत व कर्कश आवाजाने वाहने चालवून ध्वनी प्रदूषण करीत आहेत. अशा ७३ वाहनचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक गोंडे व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून अशा दुचाकी वाहनधारकांविरुद्ध कडक मोहिम सुरू केली आहे. शहरातील काही शालेय विद्यार्थी व इतर काही वाहन चालक भरधाव वेगाने, धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करीत व कर्कश आवाजाचे वाहने चालवून ध्वनी प्रदूषण करीत असल्याचे अपघात होवून त्यामध्ये निरपराध लोकांचा बळी पडू नये म्हणून प्रतिबंध करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखेकडून कडक मोहिम सुरू केली आहे. आठवड्यात आतापर्यंत ७३ चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करून दंड वसुल करण्यात आले आहे.याबाबत मोटार सायकलने स्टंटबाजी करणारे व कर्कश आवाजाने वाहने चालवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांची माहिती मोटार सायकल क्रमांकासह वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर येथे कळविल्यास त्वरीत कारवाई केली जाईल. नो-पार्किंग झोनमध्ये वाहने उभे करु नये, अपघात टाळण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन स्वप्नील धुळे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
स्टंटबाजी व ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू
By admin | Updated: July 31, 2015 01:20 IST