सुभाष धोटे : सीबीआयचा गैरवापरगडचांदूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी सीबीआयला दिल्याचे आश्चर्य वाटते. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने असल्याचा आरोप राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केला आहे.तत्कालिन राज्यपालांनी खटला चालविण्याकरिता सबळ पुरावे नसल्याचे सांगून खटला चालविण्याचे अमान्य केले होते. खा. अशोक चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात कॉंग्रेसची ताकद वाढविण्याचे काम केले असून त्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. मनोबल कमी करण्यासाठी भाजपा सरकार सीबीआयचा खा. अशोक चव्हाण यांच्या विरोधात गैरवापर करीत असल्याचा आरोपही सुभाष धोटे यांनी केला आहे या आधीचे राज्यपाल शंकर नारायणन यांनी १७ डिसेंबर २0१३ रोजी सीबीआयला खटला चालविण्यास परवानगी नाकारली होती. मग नवीन राज्यपालांनी खटला चालविण्यासाठी सीबीआयला परवानगी का दिली, हा सुडबुद्धीच्या राजकारणाचा भाग असून राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व नेते व कार्यकर्ते खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याचे धोटे यांनी म्हटले.(वार्ताहर)
अशोक चव्हाणांवरील कारवाई सूडबुद्धीने
By admin | Updated: February 6, 2016 01:06 IST