वाहतुकीचे नियम पाळा : आठवडाभरात १ लाख ३० हजारांचा दंड वसूल लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेने चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संघटना व नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’नेही सतत पाठपुरावा केला. त्यामुळे मनपा व पोलीस प्रशासनाने नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून आठवडाभरात तब्बल अडीच हजार वाहनधारकांवर कारवाई करून एक लाख ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा रोड, गांधी चौक, छोटा बाजार, नागपूर रोड हे चंद्रपुरातील अत्यंत वर्दळीचे रस्ते आहेत. या मार्गावर सतत वाहनांची व नागरिकांची गर्दी असते. मात्र अनेक जण नो पार्किंगचा बोर्ड लागलेला असतानाही रस्त्याच्या कडेला वाहन उभे करतात. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असते. त्यामुळे अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत चंद्रपूर शहर वाहतूक शाखेकडून वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास चारचाकी वाहनाला जामर लावून तर दुचाकी वाहने उचलून नेली जात आहेत. अशाप्रकारची मोहिम राबवून आठवडाभरात तब्बल अडीच हजार वाहनधारकांकडून १ लाख ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे, ही मोहिम पुढेही सुरूच राहणार असून नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करू नये, असे वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी म्हटले आहे.दुकानदार व ग्राहकांची मुजोरी ४शहरातील गांधी व कस्तुरबा मार्गावर दुकान लाईन असल्याने येथे खरेदीसाठी येणारे अनेक नागरिक व दुकानदारही मनमानी करून चारचाकी व दुचाकी वाहने दुकानासमोरच रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे या मार्गावर एकाच मार्गाने वाहतूक चालते. यातून वाहतुकीची कोंडी व अपघात घडण्याची शक्यता बळावली होती. याबाबत ‘लोकमत’ने चार दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत मनपा आयुक्त व वाहतूक पोलीस शाखेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर कारवाईला सुरूवात करण्यात आली. गेल्या आठवड्यापासून कारवाईला सुरूवात झाली असून ही मोहिम अधिक तीव्र करण्यात आली आहे. सीटबेल्ट न वापरणे, नो-पार्किंग मध्ये वाहन उभे करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जात असून या कारवाईमुळे वाहतूक व्यवस्थेत थोडा बदल दिसून येत आहे. - अशोक कोळीपोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस चंद्रपूर.
‘नो पार्किंग’मधील अडीच हजार वाहनांवर कारवाई
By admin | Updated: July 11, 2017 00:24 IST