चंद्रपूर : कृषी विभागातर्फे गुरूवारी आयोजित खरीप आढावा बैठकीत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जनजागृती फलकाचे अनावरण करण्यात आले. या फलकाचे अनावर सुधीर मनुगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. काही शेतकरी मान्सूनमध्ये तर काही पूर्व मान्सूनमध्ये कापूस पिकाची लागवड करतात. त्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी बियाण्यांच्या खरेदीच्या तयारीत आहेत. तसेच अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर भेंडवळ येथील भविष्याच्या भाकिताप्रमाणे कापूस पिकाचे उत्पन्न जास्त येण्याचे स्वप्न कापूस उत्पादक शेतकरी पहात असल्याने या संधीचा गैरफायदा काही लोक घेतात. त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक होऊ शकते. यामध्ये आर.आर.बी.टी. राऊंडअप बी.टी. तनावरची बी.टी. इत्यादीच्या नावाखाली विकल्या जाण्याची शक्यता आहे.हे बियाणे अधिकृत नसून शासनाने कुठलीही परवानगी दिलेली नाही. अशा प्रकारच्या बियाण्यांचे बिल दिल्या जात नाही. अशा बोगस व बेकायदेशीर बियाण्यांच्या पॉकेटवर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, त्याचा उल्लेख नसतो व पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण दिले नसते. अशा बियाण्यांमुळे आपल्या शेताचे तसेच पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी कापूस बियाण्याची खरेदी अधिकृत परवानाधारकाकडूनच करावी. बियाणे खरेदीचे पक्के बिल न चुकता घ्यावे, कृषी केंद्र परवानाधारक पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा. कापूस बियाण्यांच्या पॉकेटवर सरकारमान्य बोलगार्डचे चिन्ह व बोलगार्ड २ च्या चिन्हासोबत २ उभ्या रेषा गुलाबी रंगाच्या तपासून घ्याव्यात. बियाण्याचे पॉकेट सिलबंद, मोहरबंद असल्याची खात्री करूनच घ्यावी. बियाणे उगवण क्षमतेची खात्री करूनच घ्यावी. त्याची अंतिम मुदत पहावी. अशा प्रकारचे जनजागृती फलस जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लावण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्याच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प अधिकारी आत्मा, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषी जनजागृती फलकाचे अनावरण
By admin | Updated: May 3, 2015 01:36 IST