वरोरा (चंद्रपूर) : टेमुर्डा येथील बँकेतील दरोड्याला २४ तासांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही तपास यंत्रणेला ठोस सुगावे लागले नाही. त्यामुळे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र टेमुर्डा येथे चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करत तिजोरी फोडली. तिजोरीतील सहा लाख ८८ हजार व चार लाख रुपयांचे सोने लंपास केले. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पोलिसांची जिल्ह्यातील तपासयंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. डॉग स्काॅडला पाचारण करण्यात आले होते. त्याचाही काही उपयोग झाला नाही. सीसीटीव्ही फुटेज असलेले यंत्र पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची तपासणी सुरू आहे. चोरट्यांना पकडण्याकरिता पोलिसांचे दोन पथक रवाना झाले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी दिली.
चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे काढून बाहेर फेकले. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याकरीता पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागतील, असे मानले जात आहे. यापूर्वी वरोरा शहरात दिवसाच तीन घरफोड्या झाल्या. त्याच्याही आरोपींपर्यंत वरोरा पोलीस पोहोचले नसल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर बँकेत धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.