चालू वर्षांत २५३ विहिरी पूर्ण : अनेक मजुरांच्या हाताला मिळाले काममंगेश भांडेकर चंद्रपूर शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न सुरू आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही सिंचन सुविधा बळकट करण्यास हातभार लागत असून या योजनेच्या माध्यमातनू आतापर्यंत जिल्ह्यात ८६२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, २५३ विहिरींचे बांधकाम हे २०१५-१६ या सरत्या आर्थिक वर्षांत झाले आहे. या विहिरींच्या बांधकामावर ४ कोटी २५ लाख रूपयांचा खर्च झाला आहे.सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना शेतपीक घेण्यासाठी प्रोत्साहीत करणे शासनाचे धोरण आहे. मात्र अनेकांच्या शेतात सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने शासनाने सिंचन विहीर योजना सुरू करून त्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून दिले जात आहे. विहिरीचे काम हे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या जात असून विहिर बांधकामासाठी यापूर्वी मिळणारे १ लाखांचे अनुदान शासनाने वाढवून ३ लाख रूपये केले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कल सिंचन विहिर बांधकामाकडे वाढला आहे. यापुर्वी सिंचन विहिरीसाठी केवळ १ लाख रूपये अनुदान मिळायचे. या अनुदानात अनेकांच्या विहिरीचे बांधकाम अपुर्ण राहायचे. काही ठिकाणी दगड लागल्यास त्या विहिरीच्या बांधकामास अधिक खर्च अधिक यायचा. त्यामुळे शेतकरी विहिर बांधकामास निरूत्साही असायचे. मात्र अनुदान वाढविण्याचा शासनाने निर्णय घेताच लाभार्थ्यांची संख्या वाढली असून अनेकांच्या शेतात आता सिंचन विहिरी निर्माण झाल्या आहेत. रोजगार हमी योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून आतपर्यंत जिल्ह्यात ८६२ विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले असून २५३ विहिरी या चालू वर्षात पूर्ण झाल्या आहेत. या विहिरींच्या कामांवर ३३ कोटींच्यावर खर्च झाला आहे. अपुर्ण विहिरी असलेल्या काही ठिकाणी दगड लागले तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या विहिरींचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजना नियंत्रण कक्षाने दिली आहे.
रोजगार हमीतून तयार झाल्या ८६२ विहिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 01:20 IST