जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रभावित : डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध चंद्रपूर : डॉक्टरांवर होणाऱ्या हल्यांच्या घटनांचा निषेध नोंदवित इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर व महाराष्ट्रने गुरुवार २३ मार्चपासून संप पुकारला आहे. या संपात जिल्ह्यातील ७४८ डॉक्टर सहभागी झाले असून गुरूवारी अनेक शहर व गावांतील आरोग्य प्रभावित झाल्याचे दिसून आले. आयएमए हॉल चंद्रपूर येथे गुरूवारी सकाळी ११ वाजता झालेल्या बैठकीत संप करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी त्यावरील उपाययोजना व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर करण्यात आले. या मागण्यांमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या वारंवार हल्यासंबंधी शासनाने कडक धोरण स्वीकारावे, शासनाने शासकीय रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचारी वर्गाला पायाभूत सुविधा, सुरक्षा प्रदान करावी, धुळे मध्ये झालेल्या प्रकरणात प्रशासनाने विद्यार्थी, शिक्षक, रेसिडेंट डॉक्टरर्स व पॅरामेडीकल कर्मचारी वर्गावर केलेली कारवाई त्वरीत मागे घ्यावी, धुळे प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरीत पकडण्यात यावे व त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, डॉक्टर्स प्रोटेक्शन कायदा २०१० ची कडक व योग्य अंमलबजावणी करण्यात यावी, धुळे प्रकरणातील सर्व आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा, निवासी डॉक्टरांवर लादलेले निलंबन त्वरीत मागे घेण्यात यावे, डागा कमेटी रिपोर्ट निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावी व त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सभेनंतर निवासी जिल्हाधिकारी संजय धिवरे, पोलीस अधीक्षक संदिप दिवाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. प्रमोद बांगडे, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. अशोक भुक्ते, डॉ. दीपक निलावार, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. के.बी. मेहरा, डॉ. सुनील संघई, डॉ. शर्मिली पोद्दार, डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. नसरीन मावानी, डॉ. प्रियदर्शन मुठाळ, डॉ. जगदीश अग्रवाल, डॉ. रवी अलुरवार, डॉ. विवेक करमरकर, डॉ. विवेक शिंदे, डॉ. किशोर धांडे, डॉ. सचिन सरदेशपांडे, डॉ. किर्ती साने, डॉ. रेखा दांडेकर, डॉ. महेश भांडेकर, डॉ. मुंधडा यांच्यासह इंडियन मेडीकल असोसिएशन व इंडियन डेन्टल असोसिएशनचे डॉक्टर सदस्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
७४८ खासगी डॉक्टर संपावर
By admin | Updated: March 24, 2017 00:47 IST