नांदाफाटा: नांदाफाटा ते नांदा रस्त्याच्या सिमेंट कॉक्रींटीकरणासाठी खनिज निधीतून ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर त्यानंतरही रखडून असलेले काम गावकऱ्यांच्या संतापानंतर सुरू करण्यात आले. क्रेनद्वारे रस्ता खोदण्यात आला. मात्र पुढील काम ठप्प असून कंत्राटदार व बांधकाम विभागाचे अधिकारी गावकऱ्यांना केवळ काम सुरू करण्याचे आश्वासन देत आहेत. नांदा येथे जाणारा हा मुख्य रस्ता असून रोजच वाहनांची मोठी वर्दळ असते. गावात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवीपर्यंतची शाळा व महाविद्यालय आहे. याच रस्त्याने कामगारांसह शेतकऱ्यांची ये-जा सुरू असते. मात्र आता रस्ता खोदल्याने प्रवाशांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार पाठपुरावा करुन रस्त्यासाठी निधी मंजूर केला. परंतु ज्या कंत्राटदाराकडे व अधिकाऱ्याकडे या रस्त्याचे काम सोपविण्यात आले आहे, ते या कामात मोठी दिरंगाई करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सदर रस्त्यावरुन पुढे राजुरगुडा, लालगुडा, वनसडी, कोरपना या मुख्य रस्त्यावर पोहचता येते. अंतर कमी असल्याने कोरपना या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी इतर गावातील नागरिक याच मार्गावरुन जाणे पसंत करतात. त्यामुळे दिवसरात्रं या मार्गावर मोठी वर्दळ असते. नांदा गावाची लोकसंख्या १० हजाराहून अधिक असून येथे औद्योगिक वस्ती आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचून चिखल निर्माण झाला. खोदलेल्या मातीमुळे अनेक दुचाकीधारक तोल जाऊन खाली पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. रस्ता खोदून असल्याने शेतकरी व भाजीपाला विक्रेत्यांना प्रवास करणे जिकरीचे ठरत आहे. बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम करताना मोठी लगीनघाई केली व रस्ता खोदला. परंतु पुढील काम रखडून असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
६६ लाखांच्या रस्त्याचे काम कासवगतीने
By admin | Updated: April 20, 2015 01:19 IST