सकाळी ७ वाजता २ हजार १३८ केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली नाही. सकाळी १० वाजतानंतर गर्दी वाढू लागली. जिल्ह्यातील १५ तालुक्यात दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६४. ९० टक्के मतदान झाले. दुपारी २ वाजतानंतर सर्वच मतदान केंद्रांमध्ये मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सायंकाळी ३.३० वाजतापर्यंत ६४.९० टक्के मतदान झाले होते. मतदानाची अंतिम टक्केवारी ८५ च्या घरात जाईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते डोअर टू डोअर प्रचार केला. मतदानादरम्यान कुठेही हिंसक घटना घडली नाही. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मतदान केंद्रावर थर्मल स्क्रिनिंग केल्यानंतरच मतदारांना आत सोडले जात होते. एका मतदाराला तीन उमेदवार निवडून द्यायचे असेल तर तीनदा मतदान यंत्राची कळ दाबावी लागत होती. तीनदा कळ दाबल्याशिवाय बीप वाजत नव्हता.
अंधारामुळे लोनवाही केंद्रात अडचण
सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथील वाॅर्ड क्रमांक चारमधील मतदान केंद्रावर अंधार असल्याने मतदारांना निवडणूक चिन्ह दिसत नव्हते. मतदारांनी या समस्येकडे लक्ष वेधल्याने तातडीने विजेची व्यवस्था करण्यात आली. वाॅर्ड क्रमांक चारमध्ये केंद्रात एका उमेदवाराला ओळखपत्र मिळाले नव्हते. आक्षेप नाेंदविल्यानंतर अडचण दूर झाली.
राजुरा तालुक्यात सर्वाधिक मतदान
राजुरा तालुक्यात सर्वाधिक ७५.२७ टक्के मतदान झाले. तालुक्यात २९ हजार ३३३ मतदारांपैकी २२ हजार ८० मतदारांनी मतदान केले. यातही महिलांचे प्रमाण अ्धिक आहे. नवीन मतदार मोहिमेला युवतींनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पुरुष मतदारांच्या तुलनेत यंदा टक्केवारी वाढली आहे.
चंद्रपूर तालुका माघारला
चंद्रपूर तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क शहराशी आहे. निवडणूक विभागाने यंदा मतदान यादी अपडेट केली. शहराशी संपर्क असूनही दुपारी ३.३० वाजतापर्यंत केवळ ४६. ८१ टक्के मतदान झाले. गोंडपिपरी, पोंभुर्णा, मूल तालुक्यातील काही ग्रामपंचायती दुर्गम भागात असतानाही मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतल्याचे दिसून आले.
विविध राजकीय पक्षांचे लक्ष
एकाच वेळी ६०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी विविध आघाड्यांच्या माध्यमातून या निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या उडी घेतली होती. या निवडणुकीत जिल्ह्यातील निम्मे मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचा कल कुणाकडे आहे. हे कळणार आहे. या दृष्टीने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली होती. या निवडणुकीच्या दि. १८ जानेवारी रोजी मतमोजणीत कोणत्या पक्षाची समर्थित आघाडी बाजी मारते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.