राजू गेडाम मूलमूल नगर परिषदेंतर्गत ६ हजार १७० कुटुंबाचे वास्तव असून फक्त ५० टक्के म्हणजेच ३ हजार ११३ कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालय आहे. त्यामुळे हागणदारीमुक्तीचा मूल शहरात फज्जा उडाला आहे.मूल शहराची लोकसंख्या २५ हजार ४४९ असून दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे. मात्र वैयक्तिक शौचालय जवळपास ५० टक्के कुटुंबांकडे नसल्याने तसेच सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था असल्याने मूल शहरातील मोकळ्या जागा हागणदारी झाल्या आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.केंद्र शासन स्वच्छ भारत मिशन अभियान भारतभर राबवित आहे. गावाबरोबरच शहरातदेखील स्वच्छता राहावी, यासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रति शौचालय १२ हजार रुपये मंजूर करीत आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच मूल शहरातदेखील वैयक्तिक शौचालय योजना अंमलात आणणे आवश्यक आहे. यासाठी २० हजार रुपयांपर्यंत निधी मंजूर करणे आवश्यक आहे. शहरासाठी वैयक्तिक शौचालय घरोघरी झाल्यास अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे विविध आजार नियंत्रणाखाली आणण्यास मदत मिळेल, एवढे मात्र निश्चित.मूल शहरात ५० टक्के कुटुंबियांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याने त्यांना मोकळ्या जागेचा आसरा घ्यावा लागतो. विशेषत: यात महिलांची गैरसोय होताना दिसते. ग्रामीण भागात यापूर्वी ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत गावागावात शौचालय बांधण्याचा संकल्प करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने यापूर्वी अभियान राबविला. याच अभियानाला केंद्र शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेबरोबरच वैयक्तिक शौचालय बांधण्याचा संकल्प केला आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील गावागावात शौचालय बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याचप्रमाणे नगर विकास मंत्रालयाने शौचालय बांधणीसाठी निधी मंजूर केल्यास शहरात होणारे विविध आजारावर नियंत्रण घालण्यास सोईचे होईल.
मूल शहरात ५० टक्के कुटुंब शौचालयाविना
By admin | Updated: April 27, 2015 00:49 IST