खरेदी प्रक्रिया रेंगाळली : उन्हाळा संपल्यावर येणार वाहने? मंगेश भांडेकर चंद्रपूरआजच्या स्थितीत जिल्ह्यातील ३६० हातपंप बंद आहेत. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दीड महिन्यापुर्वी जिल्हा परिषदेच्या सभेत हातपंप दुरूस्तीचे सहा वाहने खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र अर्धा उन्हाळा संपत असतानाही वाहन खरेदी करण्यात आलेले नाही. वाहन खरेदीची प्रक्रिया सध्या रेंगाळली असून उन्हाळा संपल्यानंतरच वाहने खरेदी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत. यावर्षीच्या कोरड्या दुष्काळामुळे व सध्या तापत असलेल्या तीव्र उन्हामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक विहिरींची पाणी पातळी खोल गेली. त्यामुळे हातपंपाचे पाणी काही प्रमाणात पाणी टंचाई दूर करीत आहेत. मात्र जिल्ह्यातील ९ हजार ६७१ हातपंपापैकी सद्यस्थितीत ३६० हातपंप बंद पडले आहेत. यात २१४ हातपंप तात्पुरते तर १४६ हातपंप पाण्याची पातळी खोल गेल्याने बंद पडले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या हातपंप दुरूस्ती व देखभाल विभागाकडे हातपंप दुरूस्तीचे सहा वाहने होती. मात्र ती वाहने निर्लेखीत झाल्याने नव्या वाहनांची गरज निर्माण झाली. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत या वाहनांची खरेदी करणे आवश्यक होते. मात्र खरेदी करण्यासाठी तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. याबाबत जिल्हा परिषदेच्या सभेत ठरावही घेण्यात आला. त्यामुळे ३१ मार्चपुर्वी या वाहनांची खरेदी करणे आवश्यक होते. मात्र खरेदी प्रक्रिया रेंगाळल्याने या मुदतीतही वाहनांची खरेदी झाली नाही. वाहन खरेदीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्याकडून अभिप्राय मागविण्यात आला. मात्र ही सर्व प्रक्रिया करण्यात फार विलंब करण्यात आल्याने त्यांच्याकडून अभिप्राय येण्यास उशीर झाला आणि आता ही प्रक्रियाच रखडलेली आहे. सध्या एप्रिल महिना संपण्यावर असून मे महिन्यात पाणी टंचाईचे चित्र आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे वेळेत वाहने खरेदी होणे आवश्यक आहे. मात्र जिल्हा परिषदेत वाहन खरेदीसाठी सुरू असलेल्या सध्याच्या प्रक्रियेवरून उन्हाळा संपल्यानंतरच वाहने खरेदी होण्याची चिन्ह दिसून येत आहेत.
खेड्यांतील ३६० हातपंप ऐन उन्हाळ्यात बंद
By admin | Updated: April 21, 2016 01:13 IST