पालकांत संताप : बुंदीतील जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रतापतळोधी (बा) : जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा) येथून जवाहर नवोदय विद्यालय बुंदी (राजस्थान) येथे स्थानांतरित केलेला वर्ग ९ चा विद्यार्थी झाडावरून पडल्याने जखमी झाला. याबाबत विद्यालयाने पालकांना तर कळविले नाहीच; त्या विद्यार्थ्यावर उपचारही केला नाही. त्याला तशाच जखमी अवस्थेत तळोधीकडे रवाना केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अमन रवींद्र ढोबळे मु. मांगली ता. भद्रावती जि. चंद्रपूर असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. अमन झाडावरून पडून त्याचा उजवा पाय व डाव्या हाताचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राजस्थान प्रांतातील बुंदी येथे चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बा) येथील वर्ग ९ मध्ये शिकणाऱ्या मुलांचे प्राचार्यानी परस्पर स्थानांतर केले. सदर विद्यार्थी जुलै महिन्यात राजस्थानला गेला. परंतु त्याच्याविषयी पालकांना कोणतीच माहिती प्राचार्यांनी कळविली नाही. अशातच ३० आॅक्टोबरला अमन रविंद्र ढोबळे हा आवळ्याच्या झाडावरून पडून त्याच्या उजव्या मांडीचे हाड तुटले. तसेच डाव्या खांद्यालाही जबर दुखापत झाली. परंतु प्रशासनाने पालकाला याबाबत कळविण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्याच्यावर उपचारही केला नाही. अमनला रेल्वेमध्ये बसवून तळोधीकडे रवाना केले. त्यानंतर पालकांना भ्रमणध्वनीवरून आपला मुलगा गंभीर जखमी असून आपण खासगी वाहन करून नागपूरला या, असा निरोप दिला. हा सर्व प्रकार घडूनही तळोधी येथील नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. केवळ मुक्याबहिऱ्याची भूमिका घेऊन आपणाला यातले काहीच माहीत नाही. याबाबत बुंदीच्या प्राचार्यानी काही कळविले नाही, असे सांगून हात वर केले. विशेष म्हणजे, तळोधी विद्यालयाचाच विद्यार्थी जखमी अवस्थेत विद्यालयातील रस्त्यावर आणून टाकल्यानंतरही त्याला गाडीतून उतरविण्याकरिता विद्यालयाचे कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे बुंदीपासून तळोधी (बा) पर्यंत त्याला उचलणे, गाडीत ठेवणे, खाली उतरविणे, त्याची देखरेख करणे ही सर्व कामे त्याच्यासोबत असणाऱ्या १४-१५ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांनीच केली. नागपूरवरून अशा प्रकारचा गंभीर विद्यार्थी खासगी बसने तळोधीला आणला. परंतु सदर बसमध्ये गर्दी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. त्याला वेगळे रुग्णवाहिकेत पाठविण्यात आले नाही. विशेष म्हणजे, या बसचालकाने मोहाळी (नागभीड) जवळ एकदम ब्रेक दाबल्याने बसमधील काही प्रवाशीसुद्धा जखमी झाले आहे. यात जखमी विद्यार्थ्याला किती त्रास झाला असेल, याची जाणीव येते. सदर बसमध्ये जखमी विद्यार्थ्यासह ३२ विद्यार्थी व जवळपास तेवढेच प्रवासी बसले होते. जवाहर नवोदय विद्यालय, बुंदीच्या प्राचार्यांनी सदर विद्यार्थ्याला आवळे तोडण्याकरिता झाडावर चढवून त्याच्याकडून आवळे तोडून घेतल्याचे विद्यार्थ्याकडून ऐकायला मिळाले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे राजस्थानला स्थलांतर करताना प्राचार्यांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. व स्वत:च बळजबरीने विशिष्ट विद्यार्थ्याचे स्थलांतर केले. अपंग विद्यार्थ्यावरसुद्धा दया दाखविली नाही.अशा या असंवेदनशिल व माणूसकी हरविलेल्या प्राचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पालकांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला आहे. तसेच केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी व मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे पालकांनी लोकमतला सांगितले. ३६ तास जखमी अवस्थेत वेदनेने विव्हळणाऱ्या अमनला न्याय मिळणार का, याकडे लक्ष केंद्रीत झाले आहे. (वार्ताहर)
जखमी विद्यार्थ्याचा उपचाराविना ३६ तास प्रवास
By admin | Updated: November 2, 2015 00:54 IST