चंद्रपूर : राज्य शासनाने घेतलेल्या दारूबंदी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने एप्रिल महिन्यात अवैध दारूविक्री व पुरवठा होत असलेली तब्बल ३५ लाख रूपयांची दारू पकडली तर या कारवाईत २१ लाखांचा साहित्यही जप्त करण्यात आला. दारूबंदी होऊन एक महिन्याचा कालवधी उलटला असून या एक महिन्यात ४२० प्रकरणात तब्बल ५३६ आरोपींना अटक झाली आहे.सामाजिक संघटनांच्या सततच्या आंदोलनामुळे राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलापासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. अंमलबजावणी सुरू होताच जिल्हा पोलीस प्रशासन, उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी जिल्हाभरात पथक तयार केले. मुख्य मार्गावर, सीमेवर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. दारूविक्री सुरू असलेल्या भंडारा, गोंदिया, यवतमाळ या लगतच्या जिल्ह्यातून तर तेलंगाणा या लगतच्या राज्यातून दारूचा पुरवठा होऊ नये, यासाठी सीमेवर पाळत ठेवण्यात आली. त्यामुळे गस्तीवर असलेल्या अनेक पथकांनी अवैधरित्या पुरवठा होणारा दारूसाठा पकडला. तर अनेक गावात धाडसत्र राबवून अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या घरी छापे मारण्यात आले. त्यामुळे महिनाभरात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात ४२० प्रकरणात ५२६ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३५ लाख ७५ हजार ५०१ रूपयांची दारू तर २१ लाख एक हजार रूपयांचा साहित्य जप्त करण्यात आला. (वार्ताहर)
महिनाभरात ३५ लाखांची दारू तर २१ लाखांचे साहित्य जप्त
By admin | Updated: May 4, 2015 01:16 IST